नवी मुंबई: पाच मिनिटांच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला आहे. यात एका ७१ वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील आणि एका ३५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील असे एकूण १३० ग्रॅम सोन्याची चोरी झाली आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपीचे वर्णन मिळते जुळते असल्याने आरोपी एकच असल्याची शंका पोलिसांनी आहे.
सुजाता वीर या आपल्या मैत्रिणी समवेत खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभास निघाल्या होत्या. कोपरखैरणे सेक्टर ६/७ च्या बस थांब्यावर त्या बसची वाट पाहत उभ्या असताना विरुद्ध दिनेने एका दुचाकीवर दोघे युवक त्यांच्या जवळ आले आणि काही कळण्याच्या आत दोघा पैकी मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील ७० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. यावेळी त्या चोर चोर ओरडल्याही मात्र सकाळच्या वेळी गर्दी नसल्याने ते तरुण भरघाव वेगाने पळून जाण्यात यशस्वी ठरले. या बाबत तक्रार देण्यास त्या पोलीस ठाण्यात गेल्या असता त्या ठिकाणी असाच प्रकार ज्यांच्याशी घडला त्या सेलीन दासन याही आल्या होत्या.
आणखी वाचा- सकाळच्या कार्यक्रमासाठी श्री सदस्यांचाच आग्रह!, सरकारचे धर्माधिकारी यांच्याकडे बोट
सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुजाता यांची सोन साखळी चोरी झाली . या घटनेच्या पाच ते दहा मिनिटे पूर्वी सेक्टर बोनकोडे येथे या जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील ६० ग्रॅम वजनाची सोन साखळी हिसकावून दुचाकीवरील दोघे पळून गेले. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचे वर्णन मिळते जुळते असल्याने चोरटेही एकच असल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोन्ही प्रकरणात मिळून ३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १३० ग्रॅम सोन्याच्या दोन साखळी चोरी झाल्या आहरेत. या दोन्ही प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.