नवी मुंबई : केवळ आठ लाख वृक्षसंपदा असलेल्या नवी मुंबईत पालिका यंदा दोन लाख झाडे लावणार आहे. यातील वीस हजार झाडे पामबीच मार्गावरील क्वीन नेकलस परिसरात लावण्याचे काम सुरू झाले असून जून महिन्यात पहिल्या पावसात मोरबे धरण परिसरात एक लाख झाडे लावण्याचे लक्ष उद्यान विभागाने ठरविले आहे.
नवी मुंबईच्या शहरी, ग्रामीण व झोपडपट्टी भागात उर्वरित ८० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. घणसोली येथील गवळी देव व निब्बाण टेकडी परिसरात ही झाडे लावली जाणार आहेत. नवी मुंबईत सिडकोने यापूर्वी दोन लाख झाडे लावली होती. पालिकेने यात दरवर्षी भर घातली आहे. कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर पाच हजार झाडे जपानच्या मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ही झाडे चांगल्या प्रकारे जगल्याने याच तंत्रज्ञानाने ही दोन लाख झाडे लावण्यात येणार आहेत.
नवी मुंबईची ओळख सिमेंटचे जंगल म्हणून आहे. त्यामुळे पालिकेने पर्यावणविषयक उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली असून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरण आराखडा तयार केला जात आहे. यात जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर दिला जाणार असून मियावॉकी तंत्रज्ञानाने देशी झाडांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होत असल्याचे दिसून आले आहे. कोपरैरणे येथील निर्सग उद्यान व ऐरोली येथील नक्षत्र उद्यानात या तंत्रज्ञानाने झाडे लावण्यात येत असून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या पामबीच मार्गावर वीस हजार झाडांचे जंगल तयार केले जात आहे. याच परिसरात आणखी झाडे लावली जाणार असून घणसोली येथील गवळी देव डोंगर, रबाले येथील निब्बाण टेकडी, पारसिक हिल, येथील मोकळय़ा जांगावर एक लाख झाडे लावली जाणार आहेत.
नवी मुंबईतील मोकळय़ा जागेत जास्तीत जास्त झाडे लावल्यानंतर पालिकेच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरण परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षसंपदा निर्माण करण्यास वाव असल्याने या ठिकाणी सौर उर्जा प्रकल्पाबरोबरच एक लाख झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली असून यंदा दोन लाख झाडे आणि त्याचे संवर्धनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
‘एक व्यक्ती एक झाड’
संगोपण करण्याची जबाबदारी काही संस्था व व्यक्तीवर दिली जाणार आहे. शहरी, ग्रामीण व झोपडपट्टी भागाने व्यापलेल्या नवी मुंबईत मागेल त्याला रोपे दिली जाणार असून एक व्यक्ती एक झाडाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या वाढदिवसाला एक झाड लावून त्याचे संर्वधन केल्यास प्रोत्साहन पर सवलत देण्याचा प्रस्ताव देखील पालिका प्रशासना समोर आहे.
बांधकाम क्षेत्रफळानुसार वृक्ष लागवड बंधनकारक नवीन बांधकामाच्या जागी
बांधकाम क्षेत्रफळानुसार झाडे लावण्याचे बंधनकारक करण्यात आले असून झाडे लावल्याशिवाय त्या बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र न देण्याच्या एकत्रित विकास नियंत्रण नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा