नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पुढे सरकत असताना सिडकोने नवे विमानतळ-बेलापूर ते मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा पुन्हा एकदा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोची स्वतंत्र मार्गिका यापूर्वीच प्रस्तावित असली तरी या प्रकल्पाची नवी मुंबई हद्दीतील आखणी सिडकोने करावी अशी भूमिका महानगर विकास प्राधिकरणाने मांडली आहे. यानंतर सिडकोने या नव्या मार्गिकेची सुसाध्यता तपासण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जवळ आणणाऱ्या बहुचर्चित शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणारा सात किलोमीटर अंतराचा नवा सागरी मार्ग उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षीपर्यंत या विमानतळाचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी खुला करण्याचे बेत केंद्र तसेच राज्य सरकारमार्फत आखण्यात आले आहेत. यासाठी मुंबईच्या दक्षिण उपनगरांना या विमानतळास आणखी जवळ आणण्यासाठी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू तसेच जोड उड्डाणपुलांची उभारणी केली जात असताना या नव्या विमानतळाला मध्य तसेच पश्चिम मुंबईपासून दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय मिळवून देण्याचे प्रयत्नही आता सुरू झाले आहेत.
हेही वाचा – जासई उड्डाणपूल खुला झाल्याने प्रवास सुसाट; मात्र एकच मार्गिकेमुळे कोंडी कायम
मेट्रो मार्गिकांचा विस्तार सिडकोने यापूर्वीच तयार केलेल्या बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर मार्गावरील मेट्रो मार्ग पूर्णत्वास आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळताच या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या मार्गाचे काम सुरू करत असतानाच सिडकोने नवी मुंबईत वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांची आखणी केली होती. यामध्ये सीबीडी ते वाशी आणि पुढे मानर्खुदपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने मेट्रो मार्गाचा हा विस्तार पुढे कागदावरच राहिला. दरम्यान विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडको आणि एमएमआरडीएने पुन्हा एकदा मेट्रो जोड प्रकल्पाच्या आखणीचा अभ्यास सुरू केला आहे.
हेही वाचा – उरण : गोदामाच्या आगीत लग्नघर होरपळले, घराचे ३० लाखाचे नुकसान कोण भरून देणार?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आखणी सुरू
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईतील आंतराराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो आठ प्रकल्पाची आखणी यापूर्वीच सुरू केली आहे. मेट्रो मार्ग (२ ब) आणि नियोजित मेट्रो मार्ग ८ (मुंबई विमानतळ ते मानखुर्द) या दोन प्रकल्पांना जोडण्यासाठी ८०० मीटर अंतराचा एक पादचारी मार्ग उभारण्याचा निर्णयही महानगर प्राधिकरणाच्या स्तरावर घेण्यात आला आहे. हे करत असताना बेलापूर ते मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास सिडकोने करावा अशी भूमिका महानगर प्राधिकरणाने घेतली असून त्यानुसार सिडकोने नुकतीच अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची (यूएसटीसी) या कामासाठी नियुक्ती केली आहे. या सल्लागार कंपनीमार्फत सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ७.९९ किलोमीटर अंतराच्या मार्गिकेचा स्वतंत्र अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय नव्या विमानतळापासून मानखुर्दपर्यंतच्या १४.४ किलोमीटर अंतराच्या मार्गिकेचा सुसाध्यता अभ्यासही केला जाणार आहे, अशी माहिती सिडकोमधील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. या दोन्ही मार्गिकांच्या अभ्यासानंतर दोन विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाची महानगर विकास प्राधिकरणामार्फत एकत्रित आखणी करणे शक्य होऊ शकेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.