नवी मुंबई : ठाणे खाडीवर मुंबई-पुणे, पुणे-मुंबई दोन्ही दिशेला दोन नवीन बहुचर्चित उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. यापैकी वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे कामही पूर्णत्वास आले आहे. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अधिवेशनानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे चित्र आहे. एल अँड टी कंपनीने तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याचे एमएसआरडीसीला कळविले. परंतु अधिवेशन सुरू असल्यामुळे आता अधिवेशनानंतरच या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबईहून वाशीकडे जाणाऱ्या पुलाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधानसभा आचारसंहितेपूर्वी १३ ऑक्टोंबरला झाले. आता मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या वाशी खाडीपुलावरील पुलाचे कामही पूण झाले आहे. तर मानखुर्दच्या दिशेने नवी मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे.

परिणामी मानखुर्दकडून वाशीकडे येणारी वाहतूक सुरळीत व वेगवान झाली असल्याची माहिती मानखुर्द वाहतूक विभागाने दिली. अटलसेतू झाल्यानंतर सुरुवातीला वाशी उड्डाणपुलावरील ताण काहीसा कमी झाला होता. तसेच उरण, पनवेलची वाहतूक अटल सेतूवरुन जात होती. परंतू शासनाच्या टोलमाफीनंतर अटल सेतूवरुन मुंबईला दररोज जाणाऱ्या १० ते १२ हजार गाड्यांची वाहतूक पुन्हा वाशीखाडीपुल मार्गाने होत आहे. त्यामुळे वाशीवरुन टोलनाक्याजवळ मुंबईला जाताना ११ लेनची वाहतूक दुसऱ्या उड्डाणपुलाच्या तोंडाशी टोलनाक्यावर फक्त २ लेनमध्ये वर्ग होत असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांना मुंबईकडे जाताना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवी मार्गिका सुरू झाल्यावर या मार्गावरील वाहतूकही वेगवान होणार आहे.

नवी मुंबई, मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल १९७१ तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर आता ५९८ कोटी खर्चातून तयार झालेला तिसरा खाडीपूल पूर्णत्वास आला असल्यामुळे वाशी मुंबई व मुंबई वाशी वाहतुकीसाठी नव्या दोन उड्डाणपुलावर प्रत्येकी ६ लेन उपलब्ध होणार असल्याने वेगवान वाहतुकीला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, वाशीकडून येणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलामुळे वाशीवरुन मुंबईकडे येणारी वाहतूक अधिक वेगान होणार आहे, अशी माहिती मानखुर्दचे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली.वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशेकडे सातत्याने पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होत असे, परंतु आता पुण्याकडे जाणारा तिसरा उड्डाणपुल वाहतूकूसाठी खुला झाला आहे. वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलावरील उड्डाणपुलाचे कामही पूर्ण करण्यात आले असून तसे एमएसआरडीसीला कळवले आहे. त्यामुळे लवकरच अधिवेशनानंतर उद्घाटन होईल असे चित्र आहे.
विजय गुप्ता, एल अँड टी प्रोजेक्ट अधिकारी