नवी मुंबई : ठाणे खाडीवर मुंबई-पुणे, पुणे-मुंबई दोन्ही दिशांना दोन २ नवीन बहुचर्चित उड्डाणपूल तयार करण्यात आले असून आता वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे कामही पूर्णत्वास आले आहे. तर मानखुर्दच्या दिशेने नवी मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पुढील काही दिवसांतच या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार असल्याची माहिती मानखुर्द व नवी मुंबई वाहतूक विभागाने दिली आहे.

अटलसेतू झाल्यानंतर वाशी उड्डाणपुलावरील ताण काहीसा कमी झाला होता. तसेच उरण, पनवेलची वाहतूक अटल सेतूवरुन जात होती. परंतु शासनाच्या टोलमाफीनंतर अटल सेतूवरुन मुंबईला दररोज जाणाऱ्या १० ते १२ हजार गाड्यांची वाहतूक पुन्हा वाशी खाडीपूल मार्गाने होत आहे. मुंबईहून वाशीकडे येणाऱ्या पुलावरुन वाहतूक सुरू झाली असली तरी मानखुर्द दिशेकडील काम सुरू असल्याने मुंबईहून वाशीकडे येताना ५ लेनची वाहतूक २ लेनमध्ये वर्ग होत होती. त्यामुळे उड्डाणपुलाच्या तोंडाशी मानखुर्दपर्यंत रांगा लागत होत्या. परंतु आता हे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दुसरीकडे वाशीवरुन मुंबईला जाताना ११ लेनची वाहतूक दुसऱ्या उड्डाणपुलाच्या तोंडाशी टोलनाक्यावर फक्त दोन लेनमध्ये वर्ग होत असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु त्या उड्डाणपुलाचेही काम पूर्ण झाले आहे. तर मानखुर्दकडे जाताना जकात नाक्याजवळील काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे एल अँड टी कंपनीकडून उभारण्यात आलेल्या तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांतच वाशी उड्डाणपुलावरील सततच्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

वाहतूक वेगवान होण्याच्या मार्गावर नवी मुंबई, मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल १९७१ तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला होता.आता ५९८ कोटी खर्चातून तयार झालेला तिसरा खाडीपूल पूर्णत्वास आला असल्यामुळे वाशी मुंबई व मुंबई वाशी वाहतुकीसाठी दोन उड्डाणपुलांवर प्रत्येकी ६ लेन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वेगवान वाहतूकीला सुरुवात होणार आहे.१९७१ साली तयार करण्यात आलेला पुणे-मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल आधीच कायमस्वरुपी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तिसऱ्या खाडीपुलावरुन वाहतूक सुरू करण्याच्या संभाव्य तारखाही प्राप्त झाल्या आहेत. मानखुर्दहून वाशीकडे जाणारे काम पूर्ण झाले असून आता नव्या पुलावरुन सलग वाहतूक सुरु केली जाणार आहे.मंगेश शिंदे, मुख्य वाहतूक निरीक्षक, मानखुर्द

Story img Loader