नवी मुंबई : ‘नवी मुंबईचे शिल्पकार’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सिडको महामंडळाने स्वत:च्या मुख्यालयातच बेकायदा वाहनतळ उभारले आहे. टाटा पावर कंपनीच्या उच्च दाबांच्या तारांच्या खाली असणारे हे वाहनतळ मोटारचालकांच्या सोयीचे असले तरी धोकादायक आहे, असे वृत्त देत ‘लोकसत्ता’ ने या प्रश्नाला वाचा फोडली होती. शुक्रवारी दुपारी याच वाहनतळातील दोन मोटारींनी पेट घेतला. वेळीच अग्निशमन यंत्रणा तेथे आल्याने मोटारींचे अग्नितांडव थांबले आणि अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोत कामानिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्ग आणि अभ्यागतांसाठी वाहनतळाचे सुरक्षित नियोजन न केल्यामुळे मुख्यालयाला खेटून बेकायदेशीर वाहनतळ उभारले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बेलापूर येथील सिडको भवन समोरील मुख्यालयाच्या बेकायदेशीर उभारलेल्या वाहनतळामधील दोन मोटारींनी पेट घेतला. काही चालक मोटारीजवळ असल्याने त्यांनी लागलीच इतर उभ्या असलेल्या मोटारी तेथून हलविल्या. त्यामुळे आग पसरली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिडको महामंडळाने शहरांचे नियोजन केले. परंतु स्वतःच्या मुख्यालयाचे काळानुसार बदल करण्यास मंडळाला विसर पडला. यापूर्वीच्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी भविष्यातील सिडकोचे प्रकल्प ध्यानात घेऊन सिडको भवन उलव्यासारख्या नवीन उपनगराजवळ असावे, असे प्रस्तावित केले होते. मुंबईपासून हाकेच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच प्रशस्त वाहनतळ आणि दळणवळणाच्या इतर सोयींनी उपलब्ध असे हे ठिकाण निवडण्याचे नियोजन होते. मात्र अधिकारी बदलले की सिडकोच्या कामांचे प्राधान्यक्रम बदलतात, त्याप्रमाणे तो प्रस्ताव विचारधीनच राहिला.

सिडको भवनासाठी कोणतेही वाहनतळ नसल्याने वाहतूक पोलीस व नवी मुंबई महापालिकेची परवानगी न घेता टाटा पावर कंपनीच्या उच्च दाबांच्या तारांच्याखाली असणारे हे वाहनतळ मोटारचालकांच्या सोयीचे असले तरी धोकादायक आहे. याची तक्रार वारंवार सामाजिक संस्थांनी केली. शुक्रवारची आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.

मालकी हक्क नसणाऱ्या जागेवर बेकायदा अतिक्रमण करून अनधिकृत पार्किंग चालवणाऱ्या संलग्न जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून गाड्यांचे नुकसान भरून घेण्यात यावे. प्रशासकीय नियम कायदे पायदळी तुडवत अनधिकृत पार्किंगवर करोडो रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणाऱ्या व खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. टाटा पॉवरने तातडीने सिडकोला पार्किंग बंद करण्याचे निर्देश द्यावेत.सुधीर दाणी, संघटक, सजग नागरिक मंच

सीबीडी बेलापूर येथील आरबीआय इमारतीसमोरील मोकळ्या भूखंडावर काही वाहनचालकांनी वाहनाचे पार्किंग केले होते. आग लागल्याचे वृत्त समजताच जवळच असलेल्या सिडकोच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. वाळलेल्या गवतास आग लागल्यामुळे ही घटना घडून दोन वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते. प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको