उरण : द्रोणागिरी नोड ते भेंडखळ मार्गावर दुतर्फा बीपीसीएल प्रकल्पातील सिलेंडरची वाहने उभी केली आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या उरण ते मुंबई, पनवेल,नवी मुंबई तसेच पूर्व विभागातील प्रवासी वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या वाहनांमुळे अपघाताची ही शक्यता वाढली आहे. ही उभी करण्यात आलेली वाहने त्वरित हटविण्यात यावीत अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी केली आहे. सिडकोने उरणच्या द्रोणागिरी नोड ते भेंडखळ असा दुपदरी रस्ता केला आहे. हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी आहे. असे असतांना या रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून याच मार्गावर असलेल्या भारत पेट्रोलियम(बीपीसीएल)घरगूती वायु प्रकल्पात वायु भरणा करण्यासाठी आलेली शेकडो वाहने या मार्गाच्या दुतर्फा उभी करण्यात आली आहेत.
त्यामुळे या मार्गावरील एसटी, एन एम एम टी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बस ना तसेच खाजगी व दुचाकी वाहने यांना अडथळा निर्माण होत आहे. यापूर्वी आशा प्रकारची वाहने उभी केली जात असल्याने ती हटविण्याची मागणी करण्यासाठी नागरीकांना आंदोलन ही करावे लागले होते. तर वर्षभरापूर्वी याच प्रकल्पा जवळ येथील कामगार नेते राजेश ठाकूर यांचा वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. या मार्गावर वाहने उभी करू नये असे सिडकोने फलक लावले आहेत. मात्र वाहतूक विभाग व सिडकोच्या दुर्लक्षामुळे मार्गावर वाहने उभी करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी व प्रवासी वाहनांना होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.