शीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी व चायनीज खाद्यपदार्थांची चव घेणे एका दुचाकीस्वाराला चांगलेच महाग पडले आहे. खारघर ते कळंबोली या पल्यावरील बेकायदा उभारलेल्या गाड्यांवर अंडा भुर्जी खाण्याऱ्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा- वाशी खाडीवरील वाहतूककोंडी सोडविणाऱ्या बहुचर्चित तिसऱ्या पुलासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार
अंडा भुर्जी खाताना दुचाकी चोरीला
पनवेल येथे राहणारे कोंबडी विक्रेते हसन जाफर शेख हे मुंबई कुर्ला येथून दुचाकीवर पनवेलकडे जात होते. रस्त्यात त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी शीव पनवेल महामार्गावर रात्रीच्यावेळी अडीच वाजता कळंबोली येथील पुरुषार्थ पंपासमोर आपली दुचाकी थांबवली. आणि महामार्गालगत असणाऱ्या गाड्यावर ते अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले. अर्ध्या तासाने जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांची दुचाकी गायब असल्याचे समजले. हसन यांनी दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, ती सापडली नाही. अखेर त्यांनी कळंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
हेही वाचा- नवी मुंबई : शहरात ४०,४७२ घरे पाणीमीटरच्या कक्षेत आल्याने १ कोटी वसुली वाढणार !
खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत खाद्यविक्रेत्यांच्या संख्येत वाढ
राष्ट्रीय महामार्गावर खाद्यविक्रेत्यांची संख्या खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत वाढतच जात आहे. पालिकेच्या प्रभाग अधिका-यांचे या वाढत्या खाद्यविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तसेच रात्रीच्यावेळी खाद्यविक्रेत्यांवर प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने खाद्यविक्रेत्यांचे फावले आहे. त्यामुळे शीव पनवेल महामार्गावर गँस सिलेंडरच्या बाटल्यांवरील स्वयंपाक करणारी बेकायदा खाद्यविक्रेत्यांची रांग हनुमानाच्या शेपटासारखी लांबच होत चालली आहे.