नवी मुंबई एमआयडीसीतील एका ठिकाणी गटार साफ करत असताना अचानक त्यातील गाळातून उग्र वास आल्यामुळे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तिसरा कामगार मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात प्रक्रिया न करता पाणी सोडतात असा आरोप नेहमीच केला जातो. या घटनेने या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.   

विजय झाडखंड आणि संदीप हंबे असे मयत झालेल्या कामगारांची नावे आहेत तर वसंत झाडखंड उपचार घेत आहे. नवी मुंबई एमआयडीसीतील रबाळे भागात गटार तुंबले होते. त्यामुळे त्याच्या साफसफाईचे काम बिटकॉन ऑफ इंडिया या कंपनीला देण्यात आले होते. शनिवारी हे काम करत असताना भूखंड क्रमांक डब्ल्यू ३१० येथे प्रोफॅब इंजिनियरिंग प्रा.लि. कंपनीसमोरील गटार चेंबर उघडून काम सुरु करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात मलबा (गाळ-लिचड ) साठले असल्याचे लक्षात आले. त्याचा उपसा करण्यास विजय झाडखंड, संदीप हंबे आणि विजय हॉदसा हे तिघे आत उतरले होते.

हेही वाचा: नवी मुंबई : उरणचा चारफाट्यावरील अंधाराचे जाळे फिटले; महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होता हायमास्ट

गाळ काढताना अचानक त्यातून उग्र वास यायला सुरु झाले काही वेळातच हा दर्प परिसरातही पसरला. त्यात पर्यवेक्षक म्हणून काम करणारा दत्तात्रय गिरिधारी हा बाहेर उभा होता त्याने  कामगारांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने आसपाच्या लोकांच्या मदतीने त्याने तिघांना बाहेर काढले. तिन्ही कामगार बेशुद्ध अवस्थेत होते ,त्यांना नजीकच्या  रुग्णालयात दाखल केले असता त्यातील  विजय झाडखंड आणि संदीप हंबे यांना मृत घोषित केले तर वसंत झाडखंड याच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पर्यवेक्षक (सुपरवायझर) दत्तात्रय गिरिधारी याला अटक करण्यात आली असून ८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल; शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार

निष्काळजीपणा भोवला

एमआयडीसीतील गटार साफ करताना रासायनिक घटकांचा सामना होऊ शकतो हे लक्षात घेता तशी सुरक्षा कामगारांना पुरवणे क्रमप्राप्त होते. मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळेस अनेकदा उग्र वास येत असलेल्या तक्रारीकडे रासायनिक कारखानदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या दुर्लक्षामुळे दोघांचा जीव गेला असा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

Story img Loader