पनवेल : देशातील सर्वात मोठे कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि पंचतारांकित हॉटेल कळंबोली येथे होत असून त्यासाठी राज्य सरकार १७०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कळंबोली येथे केले. मंत्री सामंत यांच्या हस्ते पनवेल महापालिकेच्या ६१० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपुजन सोहळ्यासाठी ते आले होते. या प्रशिक्षण केंद्रामुळे पनवेलचे महत्व वाढणार आहे. या कार्यक्रमात मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री अदिती तटकरे, खा. श्रीरंग बारणे, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, राम शिंदे, प्रकाश शेंडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कळंबोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री चव्हाण यांनी त्यांच्या भाषणामध्ये खा. बारणे यांना पुन्हा लोकसभेवर निवडूण देण्यासाठीच आवाहन उपस्थितांना केले. मंत्री तटकरे यांनी अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृहातून उत्तम प्रशिक्षक घडले पाहीजेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात पनवेल कळंबोली, जुई, कामोठे, खारघर, बेलपाडा, रोडपाली येथे अमृत अभियानातून जलकुंभ बांधणे व जलवाहिन्या अंथरणे, तसेच याच परिसरात मलवाहिन्या अंथरणे, पनवेल शहरात ५.५० दश लक्ष लीटर क्षमतेचे मलनिःस्सारण केंद्र बांधणे, कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, कळंबोलीतील शीव पनवेल महामार्ग ते केएलई महाविद्यालय, सेक्टर १ ते सेक्टर १२ (रोडपाली तलाव) रस्त्याच्या उन्नतीकरण करणे, कळंबोलीतील सेक्टर १ ते तळोजा लिंकरोड, सेक्टर १० येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण, खारघर वसाहतीमधील लीटीलवर्ल्ड मॉल ते उत्सव चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासोबत इतर रस्ते डांबरीकरण करणे, कर्नाळा स्पोर्टस अकादमीसमोरील रस्ता उन्नतीकरण व काँक्रीटीकरण करणे, बेलपाडा येथील अंडरपास ते निफ्ट महाविद्यालय रस्त्याचे काँक्रीटीकरण, बेलपाडा मेट्रो स्थानक गणेश मंदीर ते उत्सवचौक काँक्रीटीकरण व इतर कामे, पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्ग ते मित्रानंद सोसायटीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर १ व एचडीएफसी चौकाचे काँक्रीटीकरण करणे या कामांचे भूमिपुजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.