निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघर येथील मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यासाठी लाखो जण भर उन्हात एकत्र आले होते. पण, उष्माघाताचा त्रास झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी कोण करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा : उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?
उद्धव ठाकरे म्हणाले, “डॉक्टरांनी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
“मृतांचा योग्य आकडा समोर यायला हवा”
अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. परंतु, हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की करोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डी.वाय.पाटील, टाटा रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.