संतोष जाधव,लोकसत्ता
नवी मुंबई</strong> शहराचे आकर्षण असलेल्या पामबीच मार्गालगत ७.२ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आता चांगलाच वादात सापडला असून एकीकडे सायकल ट्रॅकच्या कामात ६० झाडे तोडल्याप्रकरणी पालिकेच्या बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी नेरुळ विभागाच्या उपअभियंत्याला नोटीस बजावली आहे.तर दुसरीकडे शहराची बदनामी करत असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रतिक्रिया देणाऱ्या शहर अभियंता संजय देसाई यांच्यावरच मनमानी पध्दतीने काम करण्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा व पालिका आयुक्तांच्या दालनात मंगळवारी चड्डी आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी दिला आहे. त्यामुळे सायकल ट्रॅकच्या कामावारुन चांगलाच कलगीतुरा सुरुl होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रकल्प चांगलाच वादात अडकणार आहे.
नवी मुंबई महापालिका सायकलप्रेमींसाठी पामबीच मार्गालगतच्या समांतर रस्त्यालगत सायकल ट्रॅक तयार करत असून प्रशासकाच्या काळात करोडो रुपयांचे प्रस्ताव पास करुन पालिका अधिकारी सामान्यांच्या कररुपाने मिळालेल्या पैशांची नासाडी करत आहेत. एकीकडे याच कामात ६० झाडे तोडल्याप्रकरणी बेलापूरच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संचेती यांनी नेरुळ विभागाच्या उपअभियंत्याला खुलासा करण्याची अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा लेखी इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> रायगड : राे हाऊससाठीचा भूखंड मालक परदेशात गेल्यावर परस्पर हडपला, तिघांविरुद्ध गुन्हा
नवी मुंबई महापालिकेने जवळजवळ ९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनवण्याचे निश्चित केले असले तरी सुरवातीला७.२ किमी लांबीचा मोराज सर्कलपर्यंतचा सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन आहे. परंतू आता पालिकेने सारसोळे जंक्शनपर्यंतचाच सायकल ट्रॅक केला जाणार असल्याचे नेरुळ कार्यकारी अभियंत्यांनी सांगीतले आहे. त्यामुळे सारसोळे जंक्शनपासून मोराज सर्कलपर्यत महापालिकेची मुख्य पाण्याची पाईपलाईन तसेच कांदळवनाचा भाग असल्याने तेथील २१ झाडे त्याची परवानगी आवश्यक आहे. परंतू याच पालिकेने एमसीझेडएमला दिलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीच्यावेळी याप्रकल्पात कोणतीही झाडे तोडली जाणार नसल्याचे पत्र दिले होते. एमसीझेडएमने याबाबत हायकोर्टाची परवानगी घेण्याचे सूचित केले होते. त्यामुळे हायकोर्टाची परवानगी पालिकेला मिळाली का ? असा प्रश्न असून ही परवानगी मिळाली असेल तर पालिकेने सोरसोळे सिग्नलपर्यंतच सायकल ट्रॅक सद्यस्थितीत निर्माण करण्याचे प्रयोजन का केले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकाराभोवती संशयकल्लोळ असून दुसरीकडे पालिकेनेच एका उपअभियंत्याला नोटीस का बजावली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिका मुख्यालयापासून सुरु होणारा हा सायकल ट्रॅक मोराज सर्कलपर्यंत जाणार होता आता तो सारसोळे सिग्नलपर्यंतच जाणार आहे..या सायकल ट्रॅकचे काम मे. साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्या मार्फत सुरु असून वर्षभरापूर्वी या कामाचा कार्यादेश दिला असून काम पूर्ण करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत आहे.परंतू याच पामबीच मार्गाला समांतर जाणाऱ्या या ट्रॅकमुळे अनेक झाडांचे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरीकांकडून राजकीय पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पालिका मुख्यालयापासून वजरानी चौकापर्यंतचा भाग हा बेलापूर विभाग कार्यालया्च्या हद्दीत येत असून आता या सायकल ट्रॅकचे काम वजरानी चौकाजवळ आले आहे. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख यांनीही या सायकल ट्रॅक बाबत तक्रारी केल्या असून पालिकेची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे संकेत पालिका शहर अभियंता यांनी दिल्यामुळे चुकीच्या पद्दतीने नियमबाह्य केल्यामुळे पालिकेचीच बदनामी होत असल्याने मंगळवारी पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा व शहर अभियंत्यावरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सायकल ट्रॅकवरुन चांगलाच कलगीतुरा रंगणार असून शहरातील हा सायकल ट्रॅक चांगलाच चर्चेत आला आहे. ११.५८ कोटी खर्चाच्या या कामात वस्तुस्थितीजन्य नकाशे बनवणे,सायकल ट्रॅक बनवणे,ब्रीज व क्रॉसिंग बांधणे फ्लोरिंगकरणे,रोलिंग बसवणे असे अनेक कामे आहेत.परंतू हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला असून यामुळे शहर अभियंता विभाग व पालिका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण; सोमवारी देवगडच्या ३०० पेट्या दाखल
सायकल ट्रॅकच्या मार्गावर नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आहे. तर अनेक ठिकाणी ज्वेलऑफ नवी मुंबई तसेच नेरुळ सर्कलपर्यंत अनेक अडचणी येत असून अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक हवा तसा वळवण्यात येत असल्याचे चित्र आहे. याबाबत शहर अभियंता यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
आयुक्तांच्या दालनात आज आंदोलन करणार…. शहर अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुळातच सायकल ट्रॅकचा प्रकल्प हा सुरवातीपासूनच वादातीत आहे. अद्याप महत्वाच्या काही परवानग्या पालिकेला मिळाल्या आहेत का हा मोठा प्रश्न असून हायकोर्टाने परवानगी दिली आहे का?पालिकेने सगळ्या परवानग्या जाहीर कराव्यात.
वजरानी चौकापासून सारसोळे जंक्शनपर्यंत अनेक झाडे आहेत.त्यांचे काय करणार याचे उत्तर पालिकेने द्यावे. शहरअभियंता मनमानी करत आहेत.
विजय माने,शहरप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे गट
चौकट- नवी मुंबई महापालिकेच्या सायकल ट्रॅकच्या कामाबाबत सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून आता हा सायकल ट्रॅक सारसोळे जंक्शनपर्यंतच करण्यात येणार आहे.
गिरीश गुमास्ते,कार्यकारी अभियंता, नेरुळ विभाग
सारसोळे जवळचा सायकल ट्रॅक वाहनांच्या पार्किंगसाठी …
पामबीच मार्गालगत जाणाऱ्या सायकल ट्रॅकबाबत वादंग सुरु असताना याच सारसोळे जंक्शनच्या बाजुला पालिकेनेच रस्त्यावर तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे याच्या काळात सायकल ट्रॅक बनवला होता. त्याचा वापर सध्या फक्त रस्त्यावरची चारचाकी वाहने चालवण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे करोडो रुपयांचा खर्च करायचा पण वापर मात्र वाहने पार्किंगसाठी अशी अवस्था याच भागात असलेल्या दुसऱ्या सायकल ट्रॅकची आहे.