नवी मुंबई : ‘भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’, असे सध्या देशभर सुरू आहे. शुरा मी वंदिले ऐवजी, चोर आम्ही वंदिले हा भाजपचा नारा आहे. आज देशभरात मोदी आणि भाजपविरोधात जो असंतोष भडकला आहे त्या असंतोषाचा जनकही महाराष्ट्र असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या ऐरोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
‘‘वाढती महागाई, बेरोजगारीबाबत तुम्ही चकार शब्द काढणार नाही आणि धर्माधर्मात द्वेष वाढविण्याचे, मारामाऱ्या घडवून आणण्याचे उद्योग करणार… तुमचा पराभव झाला तर पाकिस्तानात का जल्लोष होईल? खरा जल्लोष तर भारतातच होईल,’’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा संदर्भ ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. स्वातंत्र्याच्या आधी संपूर्ण देश प्रवाहप्रतीत झाला होता. कुणीही इंग्रजांच्या विरोधात बोलायला तयार नव्हते. तेव्हा महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असे भर कोर्टात ठणकावून सांगितले होते. त्या लोकमान्यांनासुद्धा अभिमान वाटत असेल की तो माझा महाराष्ट्र आजसुद्धा जागा आहे. आज देशभरात मोदी आणि भाजपविरोधात भडकलेल्या असंतोषाचा जनकही महाराष्ट्रच आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
हेही वाचा >>> ठाण्याचा उमेदवार ‘डमी’ असल्याची गणेश नाईक समर्थकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
‘पाठिंबा देण्याचे पाप केले’
महाविकास आघाडीच्या सभांना अलोट गर्दी असते. लोक चिडले आहेत व मतदानाच्या तारखेची वाट पाहात आहे. शिवसैनिकांना विकत घेण्याचा प्रयत्न होतोय. जे विकत घेतले जात नाहीत त्यांना तुरुंगात टाकले जाते, असा आरोप ठाकरे यांनी केला. मोदी एका मुलाखतीत म्हणाले मला उद्धव यांच्याविषयी प्रेम आहे. भाजपने २०१४ साली मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित केले तेव्हा पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मला मत विचारले होते. तेव्हा तुमच्या नावाला पाठिंबा देण्याचे पाप मी केले, अशा शब्दांत उद्धव यांनी टीका केली. पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी जीम कॉर्बेटमधील जंगलात फोटोग्राफी करत होते. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिकांनी मोदींचे ढोंग उघड केले. त्यावर मोदी अजूनही बोलत नाहीत. गुजरातला देताना महाराष्ट्राचा घास तुम्ही काढून घेत आहात. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सभा घ्या. ४०० पेक्षा अधिक सभा घेऊन महाराष्ट्राला हरवून दाखवाच, असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.