लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत शुक्रवारी विविध सरकारी प्रकल्पांच्या उदघाटनासाठी येत आहेत. पंतप्रधानांच्या आगमनासाठी अवघे २४ तास शिल्लक असल्याने सभेस्थळी अंतिम टप्यातील तयारीला वेग आला आहे. सभामंडपाच्या प्रवेशव्दारावर वृक्षारोपन आणि पंतप्रधान मोदी ज्या मार्गावरुन सभेस्थळी जाणार तेथे कृत्रिम तलाव आणि गुरुवारी सकाळपासून नवी मुंबई, उरण व पनवेलच्या रस्त्यावर शेकडो पोलीसांचा बंदोबस्ताला सुरुवात झाली. चौकांमध्ये तैनात होते.
पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या मार्गावरुन सभेस्थळी जाणार त्या मार्गालगत कृत्रिम तलावाचे सुशोभिकरण सिडको मंडळाने जोरदार हाती घेतले आहे. सूमारे सातशेहून अधिक झाडे येथे लावून हा परिसर हिरवळीने नटलेला बनविण्यात येत आहे. नवी मंबई आणि उलवा व उरणच्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपन करण्याचे काम सुरु आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : पारसिक हिल पायथ्याशी उत्खनन
पंतप्रधान मोदींचा ताफा नवी मुंबई आणि उरण व उलवे वसाहतीच्या मुख्य मार्गावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळ प्रकल्पांपर्यंत सभेस्थळी जाणार असल्याने मोदींना शहराची स्वच्छता तसेच आकर्षक विद्युत रोषणाई दिसावी यासाठी मार्गाच्या दुतर्फा बाजूला पथदिव्यांची रोषणाई तसेच रस्ते चकाचक करण्याचे काम सरकारी प्रशासनांनी हाती घेतले आहे. सिडको महामंडळ, नवी मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पनवेल पालिका, रायगड जिल्हापरिषद यांच्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत. पंतप्रधान मोदी हे शिवडी न्हावाशेवा अटलसेतू या पुलावरुन प्रवास करण्याची शक्यता असल्याने एमएमआरडीए प्रशासनाने हा पुल पाण्याने धुवून स्वच्छ केला आहे.