पनवेल : राज्यातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईतील उलवे वसाहतीमधील सेक्टर १२ येथे उभारला जात असल्याने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या उलवे परिसराला भविष्यातील सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे. सिडको महामंडळ सहा मजली युनिटी मॉल बांधण्यासाठी १४१ कोटी रुपये खर्च करत असून हे व्यापारी संकुल बांधण्यासाठीचा सल्लागार नेमणे व बांधकामाबाबतची निविदा प्रक्रियेला सिडकोने सुरुवात केली आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हस्तकलेत प्रावीण्य मिळविलेल्या कारागीर, वीणकर तसेच महिला बचत गटाच्या उद्योगांना देशभरात युनिटी मॉल उभारून या माध्यमातून राज्यातील व जिल्ह्यातील उत्पादनाला नवे व्यासपीठ देण्याची घोषणा अर्थसंकल्पामधील घोषणेमध्ये केली होती. त्यानुसार राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना व्यापाराची संधी देणाऱ्या राज्यातील पहिल्या युनिटी मॉलची उभारणी नवी मुंबईतील उलवे येथे केली जात आहे. संबंधित मॉल उलवे परिसराचे मुख्य आकर्षण असणार आहे. या मॉलची इमारत वापरण्यायोग्य आणि आकर्षक असावी यासाठी बांधकामाच्या नियोजनासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : बाजारात ‘गोल्डन’ सीताफळे दाखल, मागणीत वाढ, जाणून घ्या किंमत
देशाच्या सर्वच राज्यांतील जिल्हानिहाय एक उत्पादनाला राष्ट्रीय ओळख मिळावी यासाठी अर्थमंत्री युनिटी मॉलच्या माध्यमांतून प्रयत्न करत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. योजनेत समाविष्ट झालेल्या उद्योगांचे वर्गीकरण करून सरकार अशा उद्योगांना अनुदान देईल. यामुळे स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग होईल. स्थानिक कौशल्याला व उत्पादकांना संधी मिळून त्यांना युनिटी मॉलमध्ये व्यासपीठ मिळेल. या युनिटी मॉलमध्ये व्यापारी गाळ्यांसोबत हॉटेल, मल्टीप्लेक्स आणि सभागृहाची सोय असेल.
नव्या वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांवर असलेला हा युनिटी मॉल पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार आहे. देशातील उत्पादन व्यवस्था पाहणे सुलभ होणार आहे. पुढील वर्षी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मालवाहू विमानाचे उड्डाण होणे अपेक्षित असल्याने प्रवासी वाहतूक सुरू होईपर्यंत उलवे येथील युनिटी मॉलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे सिडको मंडळाचे उद्दिष्ट आहे.