सुरुंग भरण्याच्या कामाला सुरुवात; स्फोटांची तीव्रता सुरुवातीला कमी ठेवणार
उलवा टेकडीला सुरुंग लावण्याची तयारी करण्यात आली असून, शुक्रवारी छोटे स्फोट घडविले जाणार आहेत. त्यासाठी या क्षेत्रातात प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे. ‘प्लाझ्मा’ पध्दतीने करण्यात येणाऱ्या या स्फोटांची तीव्रता सध्या कमी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या टेकडीवरील दगडांत खड्डे खोदून स्फोटक साहित्य भरले जात आहे. त्यानंतर स्फोट केले जाणार आहे. या कामांसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. या कामाला मागील शनिवारपासून सुरुवात होणार होती, मात्र पोलिसांचा पाहणी अहवाल आणि सुरुंग पेरण्यासाठी लागणारा कालावधी पाहता हे काम येत्या शुक्रवार पासून करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान उड्डाणात अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीची उंची आठ मीटपर्यंत कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी सिडकोने घेतली आहे. विमानतळ क्षेत्रातील मुख्य कामाआधी उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाला असलेला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आता काही अंशी मावळला आहे. सिडकोच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर काम करण्यास विरोध केल्यास कारवाई करण्याचा इशारा सिडकोने दिल्याने या कामांना सुरुवात झाली आहे.
सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ मायनिंग अॅन्ड फ्युअल रिसर्च (सीआयएमएफआर) या संस्थेच्या देखरेखेखाली हे काम होणार आहे. सोमवारपासून टेकडीवरील दगडांमध्ये खड्डे करून सुरुंग भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या सुरुंगाची एकाच ठिकाणी जोडणी दिल्यानंतर प्रत्यक्ष स्फोट केला जाणार आहे. त्यासाठी स्फोटाच्या परिसरात प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे.