डास निमूर्लनासाठी नवी मुंबईत करण्यात येणाऱ्या औषध फवारणीत मोठय़ा प्रमाणात भेसळ होत असल्याने आता त्या औषधाने डासदेखील मरत नाहीत. ही फवारणी केल्यानंतर गटारातून डास पळण्याऐवजी उंदीर बाहेर पडून घरात घुसत आहेत. पालिका रुग्णालयांना औषधपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनाही सोडले जात नाही. त्यांच्याकडून टक्केवारीच्या हिशेबात पाच टक्के घेतले जात आहेत आणि ही टक्केवारी कोण घेत आहे, हे जगजाहीर आहे, अशा शब्दांत नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य सेवेतील गैरप्रकारांची चिरफाड करण्यात आली. याच वेळी सध्या सुरू असलेल्या डेंगीच्या साथीला प्रशासनाबरोबरच जनतादेखील जबाबदार असल्याचे सडेतोड निरीक्षण नगरसेवकांनी नोंदविले.
नवी मुंबईत डेंगी आणि मलेरिया या आजारांनी थैमान घातले आहे. दहा घरांमागे एका घरात या तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील खासगी आणि शासकीय रुग्णालयांत या दोन आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. या विषयावर महापौर सुधाकर सोनावणे यांनी सदस्य विजय चौगुले व रवींद्र इथापे यांच्या मागणीनुसार एका विशेष सभेचे आयोजन केले होते.
या सभेत प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. रवींद्र इथापे, किशोर पाटकर, रामदास पवळे, गिरीश म्हात्रे, सीमा गायकवाड, मंदाकिनी म्हात्रे, राधा कुलकर्णी या नगरसेवकांनी तर प्रशासनाला धारेवरच धरले. शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी तर पालिकेला औषधपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडूनही पाच टक्के घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे सभागृहात ‘नाव घ्या’चा धोशा लावण्यात आला. त्या वेळी ते जगाला माहीत आहे, नाव घेण्याची गरज काय, असा प्रतिसवाल पाटकर यांनी केला. धोकादायक इमारत पुनर्बाधणीमध्ये ३३ टक्के हिस्सा मागितला जात आहे, तर वाशी, सेक्टर एकमधील गणेश टॉवरमधील रहिवाशांना लहान घरे देऊन फसवणूक करण्यात आल्याचे आरोप यापूर्वी त्यांनी केले आहेत. पाटकर यांनी केलेल्या औषधपुरवठा कंपनीतील टक्केवारीच्या आरोपामुळे सभागृहातील वातावरण तंग झाले होते. साथीच्या आजारांचे मूळ या भ्रष्टाचारात आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विशेष सभेत सर्व नगरसेवक आरोग्य सेवेवर नाराज असल्याचे दिसून येत होते. साथीच्या या आजारांना काही अंशी रहिवासीही जबाबदार असल्याचे मत पाटकर यांनी व्यक्त केले.

Story img Loader