बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई सुरू

रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगमुळे तसेच बेवारस वाहनांमुळे रस्ते स्वच्छतेत होणारा अडथळा आता दूर होणार आहे. ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाने या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.

शहरात स्वच्छता राहण्यासाठी दोनदा सफाई करण्याचे महापालिका प्रशासनाचे धोरण असले तरी विविध रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगमुळे या कामात अडचणी येत होत्या. तर शहरातील अनेक ठिकाणी वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी बेकायदेशीरपणे उभ्या गाडय़ांमुळे एकीकडे स्वच्छ अभियानासाठी तयारी सुरू असताना दुसरीकडे अशी भंगार अवस्थेत पडलेली वाहने स्वच्छतेला बाधा ठरत होती. गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’ने ‘बेकायदा पार्किंगमुळे रस्ते स्वच्छतेत खोडा’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची पालिका आयुक्तांनी दखल घेतली असून या वाहनांवर कारवाईच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. घणसोली विभागातील आशा वाहनांवर कारवाई करण्यात आली असून इतर विभागातही सुरू आहे.

‘त्या’ वाहनांची भंगारात विक्री?

पामबीच समांतर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांनी बेकायदा रस्त्याचा वापर केल्याप्रकरणी ७२ लाखांची नोटीस बजावली होती. नुकतेच न्यायालयाकडून ७२ लाखांच्या नोटिशीला स्टे देण्याची मागणी फेटाळली आहे. हे साहित्य जागेवरच विकायचे आहे. भंगार अवस्थेत पडून असलेली वाहने विकण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी सांगितले.

नवी मुंबईत रस्त्यावर धूळखात पडून उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागनिहाय कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.      – रविंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Story img Loader