पनवेल शहरातील चित्र; वाहतुकीला अडथळा
नगरपालिका असलेल्या पनवेलला महापालिका झाली मात्र येथील फेरीवाल्यांची ‘दादागिरी’ काही संपली नाही. पदपथांबरोबर आता त्यांनी रहदारीच्या रस्त्यांवरही ‘दुकान’ मांडल्याने शहरांतील प्रवास नकोसा झाला आहे. पनवेल शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थही खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात येतात. मात्र रहदारीचे रस्तेही विक्रेत्यांनी अडवल्यामुळे मोठी अडचण होत आहे.
पनवेल शहरात अनेक प्रकारच्या घाऊ क बाजारपेठा असल्याने शिवाजी चौक, टपाल नाका, उरण नाका येथे खरेदीसाठी गर्दी होत असते. बाहेरून येणाऱ्या ग्राहकांची वाहनांना पार्किंगसाठी कुठे व्यवस्था नसल्याने जागा मिळेल तेथे ती लावली जातात. शिवाजी चौक व टपाल नाक्यावरून दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होत असते. त्यात फेरीवाल्यांनी रहदारीच्या रस्त्यांचा अध्र्याहून अधिक परिसर व्यापल्यामुळे मुख्य बाजारपेठेत पायी चालणेही अवघड होत आहे. येथे नेहमीच चक्काजाम होत असतो. हे फेरीवाले रस्त्यावर कचराही टाकत असल्याने अस्वच्छता पसरली आहे.
समस्या गंभीर असताना पालिका याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांची ‘दादागिरी’ वाढली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर रस्ते मोकळे झाले होते. त्यांच्या बदलीनंतर पुन्हा फेरीवाल्यांने आपले बस्तान बसविले आहे.
ज्या भागात फेरीवाले बसत आहेत, त्या भागातील प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई केली जाईल. तरीही कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात येईल. – जमीर लेंगरेकर, उपायुक्त पनवेल महानगरपालिका