संरक्षक भिंतीअभावी पुन्हा मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडकोच्या मोकळ्या भूखंडाचा ताबा पुन्हा एकदा झोपडीधारकांनी घेतला आहे. तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी झालेल्या कारवाईत पथकावर दगडफेकीची घटना घडली होती. यावेळी संरक्षक भींत व सुरक्षारक्षक नेमण्याचे सांगूनही या उपाययोजना न झाल्याने पुन्हा अतिक्रमण झाले आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत सिडकोचे मोकळे भूखंड आहेत. त्यातील काही भूखंड सिडकोने विकले आहेत तर एक मोकळा भूखंड सिडकोच्या ताब्यात आहे. या भूखंडावर झोपडीधारक अतिक्रमण करीत आहेत. मोकळ्या जागेभवती पत्र्याचे शेड उभारले जात आहेत. सिडकोचा अतिक्रमण विभाग वारंवार या ठिकाणी कारवाई करीत आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत झोपडपट्टीधारकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याची घटनादेखील घडली होती. यावेळी त्यांना हटविले होते. मात्र काही दिवस गेल्यानंतर पुन्हा त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले आहे.

सिडकोच्या अतिक्रमण विभागात मनुष्यबळ व यंत्रणा अल्प आहे. या ठिकाणी वारंवार कारवाईत सिडको आपला वेळ व पैसा वाया घालवत आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. यापूर्वी केलेल्या कारवाईत या ठिकाणी लवकरच संरक्षक भींत व सुरक्षारक्षक ठेवण्यात येणर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कोणतीच उपाययोजना झालेली दिसत नाही. याचाच फायदा घेत हे झोपडीधारक वारंवार अतिक्रमण करीत आहेत.

या ठिकाणी पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. कायस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी लवकरच घेतील.        -बी.बी.राजपूत, अभियंता, अतिक्रमण विभाग, सिडको.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized slums in navi mumbai
Show comments