कचरा, शौचालयाची दुरवस्था, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छ रेल्वे स्थानकांची ख्याती असलेल्या नवी मुंबईतील स्थानकांच्या देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे दुरवस्था होताना पाहावयास मिळत आहे. खारघर रेल्वे स्थानकात पसरलेला कचरा, शौचालयाच्या दरुगधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक १च्या आजूबाजूला कचरा पडलेला आहे. कचऱ्याचे ढीग फलाटाला लागूनच असल्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरली आहे. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरून वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशी स्वच्छतागृहाचा वापर टाळत आहेत. पान खाऊ न थुंकल्याने भिंतीही लाल झाल्या आहेत. रेल्वे स्थानकात फलाटावर जागोजागी भटकी कुत्री फिरताना दिसत आहेत.

फेरीवाल्यांचा विळखा

फळे, भाजी विक्रेते फलाटावर कुठेही, कशीही बसत आहेत. तिथेच जेवण करीत असून कचरा टाकतात. संध्याकाळी प्रवाशांना मार्ग काढत येथून कसेबसे बाहेर पडावे लागते.

बेकायदा वाहनतळ?

रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा पार्किंग होत आहे. चारचाकी, दुचाकी, सायकल परवानगी नसतानाही उभ्या केल्या जात आहेत. काही वाहने तर बऱ्याच दिवसांपासून उभी आहेत.

स्टेशन परिसरातील असुविधा या रेल्वेच्या अखत्यारित येत नसून सिडकोकडे येतात. परिसराची देखभाल करणे ही सिडको रेल्वे प्रकल्प यांची जबाबदारी आहे.    – ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी

खारघर रेल्वे स्थानक दररोज स्वच्छ केले जाते. आम्ही इतर समस्यांबाबत संबंधित विभागाशी संपर्क करू व स्थानकातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू.   – व्ही. टी. रवी, अधीक्षक अभियंता

पूर्वी खारघर स्थानक स्वच्छ होते. मात्र गेल्या काही दिवसांत अस्वच्छता वाढली आहे.    – मेघा पाटील, रहिवाशी, खारघर

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncleanness at kharghar railway station