नवी मुंबई – ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण क्षमतेने सहभागी झाली असून व्यापक लोकसहभागावर भर देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला जात आहे. यामध्ये सफाईमित्रांचा दहीहंडी महोत्सव असा एक अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय वास्तूसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो सफाईमित्रांनी व स्वच्छतामित्रांनी सहभागी होत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी उपस्थित राहून सहभागी सफाईमित्र व स्वच्छतामित्रांना प्रोत्साहित केले.
हेही वाचा – सिडकोची फसवणूक प्रकरणी शिरीष घरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दैनंदिन शहर स्वच्छता कामात मनापासून काम करणाऱ्या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या कामाचा नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केलेला आहे. कोणत्याही राष्ट्रीय व राज्य सणाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्याची परंपरा नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने जपली आहे. त्याच अनुषंगाने आज दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून रोजच्या कामापेक्षा काहीसे वेगळे आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात यावेत व इंडियन स्वचछ्ता लीगमध्ये अनोख्या उपक्रम आयोजनातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित व्हावा यादृष्टीने आयोजित केलेल्या स्वच्छता दहीहंडी उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. सफाईमित्रांनी स्वच्छतामित्रांसह मानवी थर रचले आणि सफाईमित्राच्या मॅस्कॉटने ही हंडी फोडली. पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत या हंडीमध्ये दह्याऐवजी फुलांच्या पाकळ्या भरून ठेवल्या होत्या. हंडी फुटल्यानंतर डोक्यावर होणाऱ्या फुलांच्या वर्षावात सफाईमित्र व स्वच्छतामित्रांनी एकच जल्लोष करीत आनंद साजरा केला.
हेही वाचा – श्री मूर्ती विसर्जन करणारे स्वयंसेवक विमा सुरक्षा कवचच्या प्रतीक्षेत
‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत संपन्न झालेल्या या सफाईमित्रांच्या इकोफ्रेंडली दहीहंडी उत्सवात प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या उपस्थितीत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या समवेच सर्वांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण केली. सफाईमित्र व स्वच्छतामित्रांनी हा स्वच्छता दहीहंडी महोत्सव अत्यंत जल्लोषात व उत्साहाने साजरा केला.