जयेश सामंत
नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असलेली राज्यातील मुंबईनंतरची एकमेव महापालिका म्हणून मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला आपल्या हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांना समान पाण्याचा पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणातून पाणी वाहून आणणाऱ्या जलवाहिन्यांचा पहिला थांबा असलेल्या बेलापूर, नेरुळ, वाशीकरांना भरपूर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महापालिकेची कोपरखैरणेपासून दिघ्यापर्यंत मात्र पुरेसे पाणी पुरविताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ऐरोली, दिघावासीयांना तर दरडोई १५० लिटर इतके पाणीही नियमित वाट्याला येत नसल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरणातून दररोज मिळणाऱ्या एकूण पाण्यापैकी राज्य सरकारच्या आदेशानुसार सिडको हद्दीत येत असलेल्या खारघर, कळंबोली, उलवे यासारख्या वसाहतींना ५० एमएलडी इतक्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो. याशिवाय पाण्याची गळती, वितरण व्यवस्थेतील दोष यामुळे काही टक्के पाणी वाया जाते. त्यानंतरही नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा या उपनगरांना महापालिका दिवसाला ३२० ते ३५० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचे वाटप करत असते.
हेही वाचा… करंजा रेवस जलमार्गावर १० रुपयांनी तिकीट दरवाढ; सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी
खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मोरबे धरणाची जलवाहिनी भोकरपाडा येथून नवी मुंबईच्या दिशेने आणण्यात आली आहे. त्यामुळे मोरबेच्या पाण्याचा पहिला प्रवाह बेलापूर, सीवूड्स, नेरुळ या उपनगरांमधून येत पुढे ऐरोलीच्या दिशेने येत असतो. पाणी वाटपातील नियोजनात अधिक सुसूत्रता यावी यासाठी महापालिका महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन ते तुर्भे स्टोअर, ऐरोली, दिघा यासारख्या परिसराला पुरवत असते. एमआयडीसीकडून साधारणपणे दिवसाला ८० एमएलडी इतके पाण्याचा कोटा मंजुर असूनही महापालिकेस प्रत्यक्षात ६० एमएलडी इतकेच पाणी मिळते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे बिघडले असून बेलापूर, नेरुळ तुपाशी तर दिघा, ऐरोली पाणीपुरवठ्याच्या आघाडीवर उपाशी असे चित्र प्रकर्षाने दिसून लागले आहे.
हेही वाचा… अपघातग्रस्ताला मदत करणे पडले महागात, थेट चाकुने वार; नवी मुंबईतील घटना!
कोपरखैरणे ते दिघा दरडोई पाणीवाटपाचा तिढा
पाणीपुरवठा विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईत दरडोई सर्वाधिक पाण्याचा वापर सीबीडी बेलापूर विभागातील रहिवाशी करत आहेत. राज्य सरकारच्या मानकानुसार शहरी विभागात दरडोई किमान १५० लीटर इतका पाण्याचा पुरवठा करावा असे स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश आहेत. नवी मुंबई महापालिका हद्दीत हे गणित २०० लीटरपर्यत गृहीत धरण्यात आले असून त्यानुसारच सिडको वसाहतींमध्ये महिन्याला ३० हजार लिटर पाणी वापराला अवघे ५० रुपयांचे पाणी बिल आकारण्यात येते. ठरावीक विभागात पाणी वापराची चंगळ सुरू असताना ऐरोली, दिघा या उपनगरांमध्ये अनेक भागात दरडोई १३६ ते १६० इतकाच पाण्याचा पुरवठा होत असून सीबीडी-बेलापूर, नेरुळ, तुर्भे या उपनगरांत हे प्रमाण दरडोई १९० लिटरपेक्षाही अधिक आहे. वाशीत दरडोई १६५ ते १७० लिटर इतका पाण्याचा पुरवठा होत असून कोपरखैरणे, ऐरोली, दिघ्यापेक्षा हे प्रमाण काहीसे अधिक आहे. विशेष म्हणजे, लगतच्या उपनगरांना कमी पाण्याचा पुरवठा होत असताना घणसोलीत मात्र दरडोई १७५ लिटरपेक्षाही अधिक पाण्याचा वापर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा… नवी मुंबई : पब चालवण्यासाठी ४० हजारांचा हफ्ता देण्यास नकार, व्यवस्थापकावर चाकूने हल्ला; पोलीसांनाही…
ठिकाण | पाण्याचा पुरवठा | वापर |
सीबीडी-बेलापूर | ४८ एमएलडी | २०० ते २१० लिटर दरडोई |
नेरुळ | ५४ एमएलडी | १९० ते १९५ दरडोई |
तुर्भे | ५५ ते ६० एमएलडी | १९० ते १९५ दरडोई |
वाशी | ३१ एमएलडी | १६५ ते १७० दरडोई |
घणसोली | ४३ ते ४५ एमएलडी | १७५ ते १८० लिटर दरडोई |
कोपरखैरणे | ४० एमएलडी | १४० ते १५० लिटर दरडोई |
ऐरोली | ३३ ते ३५ एमएलडी | १५५ ते १६० लिटर दरडोई |
दिघा | १२ ते १४ एमएलडी | १३५ ते १४० लिटर दरडोई |
महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर असलेले ८० एमएलडी इतके पाणी महापालिकेस मिळाले तर पाण्याचे प्रभावी वाटप करणे शक्य होऊ शकेल. सद्य:परिस्थितीत मोरबे धरणाचे पाणी सिडकोच्या काही उपनगरांना वितरीत केले जाते. त्यामुळे काही महापालिका हद्दीतील काही उपनगरांना पाण्याचे अधिकचे वाटप करणे शक्य होत नसले तरी येत्या काळात समान पाणीवाटपासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. – संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका