उरण : वाढते समुद्री प्रदूषण, मच्छिमारांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ, त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे होणारे परिणाम यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सहकार भारती ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबईत विष्णुदास भावे सभागृहात सकाळी १० वाजता मच्छिमारांच्या देशव्यापी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे या संमेलनात मत्स्य व्यवसायाच्या वाढी आणि विकासासाठीच्या पर्यायायांची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
एकात्मिक शाश्वत मस्त्य व्यवसाय विकास अंतर्गत होणाऱ्या या संमेलनात देशभरातून ८०० तर महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यातील ४५० हुन अधिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच यात धोरणकर्ते सहकारी, उद्योजक आणि नेते या संमेलनात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. या संमेलनात मस्त्य व्यवसायासाठी स्वतंत्र धोरण तयार करून, जगाला योगदान देणाऱ्या मच्छिमार बांधवांवर सरकारचे लक्ष केंद्रीत करण्याचा उद्देश आहे.
हेही वाचा : पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल
हेही वाचा : नवी मुंबईतील विकासकामांवरून शिंदे गटाची नाईकांवर आगपाखड; झोपडपट्टी पूनर्विकासावरून तणाव वाढला
मत्स्यव्यवसायाचा देशाची निर्यात व्यवस्था, पोषण आणि सुरक्षा व्यवस्थेमध्येसुद्धा मोलाचा वाटा आहे. देशात महसूल मिळवून देणाऱ्या व्यवसायांमध्ये हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर आहे. मच्छिमार हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. देशात या घटकाचे योगदान केवळ सांस्कृतिक नसून , स्वातंत्र्यानंतर मत्स्यव्यवसाय दुर्लक्षित राहिला आहे. या व्यवसायाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय मत्स्य उत्पादनामध्ये आणि मत्स्य निर्यातीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर येण्याचे उद्दीष्ट ठेवून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाही सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून हरितक्रांती, श्वेतक्रांतीप्रमाणे नीलक्रांती घडवण्याचा सरकारचा प्रयत्न पूर्ण करण्यासाठी या राष्ट्रीय मस्त्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विभागाचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संस्कार भारती नवी मुंबईचे जिल्हा सचिव अॅड. चंद्रकांत निकम यांनी दिली आहे.