पनवेलमध्ये दहा एकर क्षेत्रात एकात्मिक विकासाचा प्रयोग; एकूण १०० एकर क्षेत्रात नगर वसवणार
संतोष सावंत
शेतजमिनींचे नागरीकरणासाठी भूसंपादन झाल्यानंतर मिळालेल्या मोबदल्यात पुढची हयात घालवण्याऐवजी या बदलात सहभागी होऊन भविष्य अधिक सक्षम करण्याचा प्रयोग पनवेलमधील पेठार्ली गावच्या शेतकऱ्यांनी केला आहे. महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यानंतर गावाच्या शेतजमिनी विकासकांना विकण्याऐवजी येथील शेतकऱ्यांनी एकात्मिक विकासाच्या माध्यमातून गृहनिर्मिती करण्याचा विडा उचलला आहे. गावातील शंभर एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी दहा एकर क्षेत्रावरील विकासाला नुकतीच सुरुवात झाली.
शेतकऱ्यांनीच आपल्या शेतजमिनींचा विकास करून गृहप्रकल्प उभारण्याची नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पहिलीच घटना आहे. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या या इच्छाशक्तीला बळ देत प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत देऊ केली आहे.
पुणे येथील मगरपट्टा येथे गावच्या शेतकऱ्यांनी एकात्मिक विकास करून भव्य गृहप्रकल्प साकारला. त्याच धर्तीवर पेठार्ली गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येथे गृहप्रकल्प राबवण्याचा निर्धार केला. त्यासाठी येथील शेतकऱ्यांचा एक गट मगरपट्टा येथे गेला आणि तेथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे गट बनवण्यात आले. एकूण शंभर एकर जमिनीवर एक नगरी वसवण्याची शेतकऱ्यांची योजना आहे. मात्र, एवढय़ा मोठय़ा स्तरावर गृहप्रकल्प उभारण्यातील संभाव्य धोके पाहून आयुक्त गणेश देशमुख यांनी शेतकऱ्यांना दहा-दहा एकर क्षेत्र जमिनींवर टप्प्याटप्प्याने विकास करण्याचा सल्ला दिला. तसेच पालिकेने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून विकास नियमावलीच्या नियोजनानुसार या प्रकल्पक्षेत्रात २४ मीटर रुंद रस्त्याला मंजुरीही दिली. हा रस्ता बांधण्यासाठी आर्थिक नियोजनाचा प्रश्न उद्भवल्यानंतर घोट गावातील के. डी. पाटील अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला. हा रस्ता बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तो पाटील हे करणार असून शेतकऱ्यांकडे येतील तसे त्यांनी या रकमेची परतफेड करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
हा सर्व विकास करण्यासाठी अर्थात मोठी आर्थिक तरतूद लागणार आहे. मात्र गृहसंकुलात रस्ते, पाणी व इतर सर्व सुविधा, प्रदूषण नसलेले ठिकाण आणि दर्जेदार घरे यामुळे या घरांना खारघरप्रमाणे दर मिळेल. बांधकामासाठी गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात पुढे येतील, असा आशावाद येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
दीडशे शेतकरी करोडपती होणार
पेठार्ली गावातील हा प्रयोग सध्या संपूर्ण पनवेलमध्ये चर्चेचा विषय आहे. यापूर्वी शेतजमिनींच्या भूसंपादनातून मिळणारा मोबदला घेऊन नंतर विकासकांच्या प्रकल्पांसाठी वाळू, विटा, बांधकाम साहित्य पुरवण्याची छोटी-मोठी कामे स्थानिक भूमिपुत्र घेत असत. यात व्यावसायिक स्पर्धेतून शेतकऱ्यांमध्ये संघर्षही होत असे. मात्र, पेठार्लीतील शेतकऱ्यांनी एकात्मिक विकासाच्या माध्यमातून वेगळा आदर्श उभा केला आहे. या विकासातून गावातील दीडशे शेतकरी करोडपती होणार आहेत.
पेठार्ली गावातील शेतकऱ्यांनी जमिनी विक्री करण्याऐवजी सर्वानी एकत्र येऊन विकास करणे हेच शाश्वत विकासाचे धोरण आहे. मी स्वत: याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी स्वत: व्यावसायाकडे वळतात ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्यांना कायदेशीर प्रक्रिया परवानगी इत्यादीबाबत सर्वतोपरी सहकार्य करतोय. भविष्यात याचा बोध सारेच शेतकरी घेऊ शकतील. – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
(तळोजा पेठार्ली गावाजवळ शेत जमिनीतून २४ मीटर रुंदीचा रस्ता बनविण्याचे काम सोमवारी सूरु झाले)