नवी मुंबई : पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वेतनातील ७० कोटी रुपयांचा फरक देण्यास सत्ताधारी चालढकल करीत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीत आणण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी हे ठेकेदारांचे दलाल असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या रंगनाथ औटी यांनी केला.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच शिवसेना सदस्य रंगनाथ औटी, बहादूर बिश्त आणि चेतन नाईक यांनी कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या वेतनातील फरकाचा मुद्दा उपस्थित केला. थकीत वेतनाचा प्रस्ताव का आणला जात नाही असा जाब विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विचारला.
नवी मुंबई महापालिकेतील ६ हजार २७७ कामगारांच्या २७ महिन्यांच्या वेतनातील थकबाकीपोटी १४० कोटी खर्च अपेक्षित होता. त्यापैकी पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ७० कोटी रुपयांचे वाटप ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आले. उर्वरित १४ महिन्यांपोटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक ७० कोटी रुपये देणे बाकी आहे.
याबाबतचा ठराव २९ ऑगस्ट २०१९ रोजी महासभेत मंजूर करण्यात आला. परंतु सातत्याने पाठपुरावा करूनही सत्ताधारी हा प्रस्ताव स्थायी समितीत आणत नसल्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातला. या वेळी आक्रमक झालेल्या बिश्त यांनी महापालिका सचिव चित्रा बावीस्कर यांच्या टेबलावरील कार्यक्रम पत्रिका हिसकावून भिरकावत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. त्यातच स्थायी सभापती नवीन गवते यांनी पटलावरील सहा प्रस्ताव मंजूर केले.