उरण : गेल्या दोन वर्षांपासून जागतिक व देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली होती. मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक ५९ अंकांवर होता. या अंकात सातत्याने सुधारणा होत आहे. त्यामुळे वातावरणही आल्हादायक झाले आहे.
वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रता याचा येथील नागरिकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होऊ लागला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उरणमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० च्या वर नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदूषित मात्रा मानवी शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. बदलत्या वातावरणात वाढते तापमान आणि आर्द्रतेतही वाढ झाले आहे. याचा परिणाम येथील नागरिकांच्या शरीरावर परिणाम होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवेतील धुळीकणाच्या कक्षेतील शहरांत उरण हे देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. अनेकदा अतिशय धोकादायक असलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० पार पोहचला होता. ही आकडेवारी हवेतील प्रदूषणाची उच्च पातळी आहे. हवेतील या वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने दक्षता घेत येथील नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना केली आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी त्यावेळी चिंता व्यक्त केली होती, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यासंदर्भात नॅटकनेक्ट फाऊंडेशनमार्फत करण्यात आलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पर्यावरण आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाला याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.
हवेची गुणवत्ता पात्रता
हवेतील प्रदूषणाची मात्रा ही ० ते ५० चांगली, ५० ते १०० मध्यम, १०० ते १५० आजारी व श्वसन विकारासाठी हानीकारक तर १५० ते २०० ची मात्र ही आरोग्यास प्रचंड हानीकारक मानली जाते. या मात्रेनुसार उरणच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा ही माणसासाठी प्रचंड हानीकारक बनली आहे. या हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत.