जलप्रवाशांची ताटकळ संपली
उरण : अलिबाग व उरणला जोडणाऱ्या करंजा खाडी किनाऱ्यावरून जलमार्गाने रेवस ते करंजा असा प्रवास करता येत असून दर एक तासांनी बोटसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ही गैरसोय आता दूर झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सुरू केली आहे.
अलिबाग व उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या जलप्रवासासाठी मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने बोटीची सोय केलेली आहे. या मार्गातील २० मिनिटांच्या प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र दर तासानंतर ही सेवा असल्याने या दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तासभर ताटकळत राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना काही वेळा परतीच्या मार्गावर यावे लागत आहे. ही सेवा बारमाही सुरू असल्याने प्रवाशांना याचा फायदा होत असला तरी हा प्रवास धोकादायकही आहे, असे असतानाही दररोज हजारो प्रवाशी याच मार्गाचा वापर करीत आहेत. तर मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा पावसाळ्यात बंद केल्यानंतर याच मार्गाचा वापर करीत मुंबई ते अलिबाग असा प्रवास शेकडो प्रवासी करत असतात. त्यामुळे ही जलसेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.
याच मार्गावर रो रो सेवा सुरू करण्यात येणार असून त्यातील करंजा जेट्टीचे काम पूर्ण होत आले आहे. तर रेवस जेट्टीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करंजा रेवस खाडी पुलाचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळेच या मार्गाचे महत्त्व लक्षात येते. रेवस करंजा दरम्यान ही सेवा सुरू झाल्याने आम्हाला याचा फायदा होत असल्याचे मत या मार्गावरील प्रवासी आशीष घरत यांनी व्यक्त केले.
प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही. मधल्या वेळात ही बोट उपलब्ध होणार आहे.
ही सेवा नव्यानेच सुरू करण्यात आली असून १८ ते २० मिनिटात प्रवासी प्रवास करीत आहेत. या बोटीची क्षमता १० आहे. तसेच प्रवाशांना नेहमीची बोट चुकल्यानंतर या बोटीचा वापर करता येत असून पुढील काळात जादा प्रवासी क्षमता असलेल्या बोटी येणार आहेत.
-राहुल धायगुडे, बंदर निरीक्षक