उरण : शेती हा व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी निर्माण झालेल्या चिरनेरच्या महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाने दोन वनराई बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यामुळे पावसानंतरच्या शेत पिकांना पाण्याचा ओलावा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी उरणच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य केले. उरण मधील शेती संपुष्टात येत असतांना शेतकरी नवं नवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवणे काळाची गरज असून, शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वनराई बंधारे वरदान ठरत आहेत. चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय गटामार्फत आणि उरण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ- नारनवर, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, श्री महागणपती सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषीसहाय्यक अधिकारी सुरज घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले.
हेही वाचा : उशीर झाला तरी मोरा – मुंबई रो रो जलसेवा २०२४ ला सुरू होणार; मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा दावा
चिरनेर गावातील शेतावरील ओढ्या नाल्यांच्या परिसरात दोन वनराई बंधारे बांधण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत. दरवर्षी पावसाचे पाणी खूप पडते. हे पाणी धरण असो अथवा छोटे ओहोळ किंवा ओढे यामध्ये साचत असते. मात्र पाऊस गेला की ओढे नाले काही दिवसातच सुखे ठाक पडत असतात. त्यामुळे पाण्याची पातळी वाढवून, काही दिवस पाणी येथेच अडविले, तर काही महिने या पाण्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागत असतात. यातून ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते. त्याचबरोबर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्नही मार्गी लागत असतो. पावसाळा संपला की पाण्याचे विविध स्तोत्र तळ गाठत असतात. मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण आडवू शकतो. आणि हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत असते.
हेही वाचा : उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा, नवी मुंबईत शरद पवार येणार
उन्हाळा आला की आपल्याला पाण्याचे महत्व समजते. कारण विहीरी, तलाव, कुपनलिका, ओढे असे पाण्याचे असलेले स्तोत्र, तळ गाठण्याची स्थिती निर्माण करीत असतात. पाणी हे आपले जीवन आहे. कारण जल है तो हम है. अशा पद्धतीचे उच्चार सातत्याने आपण करीत असतो. मात्र ते आचरणात कोणीही आणत नाही. तुरळक ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले जाते. मात्र प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्य म्हणून पाणी अडविले पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे पाणी अडवून जिरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.