उरण : लोकभावना म्हणून उदघाटना शिवाय नवी मुंबईतील मेट्रो सुरू झाली. मात्र मागील पंचवीस वर्षे उरणमधील प्रवासी व नागरिक ही चातकासारखी या लोकलची वाट पहात आहेत. त्यामुळे उरणकरांचाही लोकभावना ही तीव्र आहेत. मागील आठवड्यात रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. तर
नऊ महिन्यांपूर्वी उरण ते खारकोपर मार्गावरील लोकलची यशस्वी चाचणी झाली आहे. त्यानंतर ही हा मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे उरणच्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील गव्हाण स्थानकाचे काम अपूर्ण असले तरी हा मार्ग सुरू होण्यासाठी सज्ज आहे. परंतु उदघाटनासाठी देशाचे पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्यामुळे हे उदघाटन लांबले असल्याची चर्चा आहे. एकीकडे मार्ग सुरू झाल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उरणच्या नागरीकांना ही उरण ते खारकोपर हा मार्ग सुरू व्हावा अशी अपेक्षा असतांना याकडे का दुर्लक्ष केलं जातं असा सवाल उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकुर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे हा मार्ग लवकरात लवकर सुरू न केल्यास उरण मधील प्रवासी व नागरिक रेल्वे विरोधात आंदोलन पुकारतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.