उरण : येथील जसखार, सोनारी, करळ आणि सावरखार या चारही गावांना जोडणारा पारंपरिक रस्ता जेएनपीटी रेल्वेमुळे बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही या गावातील नातेवाईक दररोज नात्यांच्या ओढीने एकमेकांच्या भेटीसाठी या धोकादायक रेल्वे मार्गावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे जेएनपीटीने या चारही गावांच्या नाते संबंधाला जोडणारा रस्ता पूर्ववत सुरू करावा अथवा या गावा दरम्यान सोनारी ते जसखार असा स्कायवॉक बांधावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जेएनपीटी व्यवस्थापनाकडे केली आहे. याकरिता जेएनपीटी ने अहवाल मागविला आहे. मात्र त्याची प्रतीक्षा अनेक महिन्यांपासून आहे.
हेही वाचा : गॅस सिलिंडरचा स्फोट आणि आगही; दुसऱ्या माळ्यावर ७ ते ८ जण अडकले
उरण तालुक्यातील अनेक गावांचे समूह हे पुर्वापार एकत्र व्यवहार करीत आहेत. त्याचप्रमाणे या चारही गावांचा बाजार , शाळा, रेशनिग, नातेवाईक व देव दर्शन ही नित्याची गोष्ट होती. मात्र सध्या या गावांना जोडणारा मार्ग हा जेएनपीटी बंदरात जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे धोकादायक बनला आहे. त्यामुळे या चारही गावांना जोडणारा पर्यायी मार्ग बनविण्याची मागणी सोनारी येथील ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने तसेच जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त कॉ. भूषण पाटील व सामाजिक कार्यकर्ते एल. बी. पाटील यांनी जेएनपीटीकडे लेखी स्वरूपात केली होती. याचे जेएनपीटीने उत्तर देत अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे. मात्र ही प्रतीक्षा कधी संपणार असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.