उरण : गेल्या काही दिवसांपासून उरणच्या हवेची गुणवत्ता खालावू लागली असून गुरुवारी दुपारी हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार गेल्याने प्रदूषणात उरण शहर देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर गणले गेले. परंतु, धूलिकणवाढ मानवी शरीरास घातक नसल्याचा दावा विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणच्या हवेचा निर्देशांक ३१८ वर पोहोचला होता. गेल्या अनेक वर्षांपासून उरणच्या प्रदूषित हवेच्या मात्रेत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सर्दी-खोकला आणि श्वसनाचाही त्रास होऊ लागला आहे. सध्या आर्द्रता वाढत असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात.

हे ही वाचा… पवार, ठाकरे नेमके कुणाचे? फूट पडूनही शेकापकडून प्रचार पत्रकांमध्ये नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.

उरण परिसरात सध्या सकाळी धुके पडत आहे. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत आहे, तर किमान तापमान २० ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पावसाळ्यानंतर वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धूलिकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबरच अनेक मानवनिर्मित कारणेही प्रदूषणात भर घालत आहेत.

हे ही वाचा… एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

पावसाळ्यात येथील राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या मातीची धूळ झाली आहे. या मार्गावरून दररोज हजारो जड वाहने ये-जा करीत असल्यानेे त्याचप्रमाणे शेतीच्या मळणीला सुरुवात झाल्याने उरण परिसरात धूलिकणांत वाढ झाली असल्याने हवा गुणवत्ता खालावली आहे. मात्र ही हवा हानीकारक नाही. उरणमध्ये हवा गुणवत्ता मोजण्यासाठी व्यवस्था आहे. – विक्रांत भालेराव, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

आजारांबाबत काळजी काय घ्यावी?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेये, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

हे ही वाचा… रायगड काँग्रेस अखेर प्रचारात सक्रिय; काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाल्याची महेंद्र घरत यांची माहिती

धुळीमुळे हवा खराब

उरण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील अवजड वाहनांची वाढती संख्या तसेच व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. वाहनांच्या धुरामध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran city in raigad district ranks third in the country for air pollution citizens facing respiratory problems asj