उरण : पाताळगंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या रसायनामुळे नदीतील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील दादर ते उरणच्या गोवठणे खाडीपर्यंत याचा परिणाम झाला आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक मासेमारीवर परिणाम झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून स्थानिक मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेने केली आहे.

पनवेल तालुक्यातील रसायनी परिसरातून अरबी समुद्राला पेण व उरण मार्गे मिळणाऱ्या या नदीच्या पाण्यामुळे तिन्ही तालुक्यांतील स्थानिक आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या हजारो मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – पनवेलमध्ये ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

मागील दोन दिवसांपासून पेण तालुक्यातील दादर खाडी परिसरात रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले आहेत. यामुळे पेण खारपाडा ते उरण गोवठणेपर्यंतच्या खाडीला याची झळ मासेमारी करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकास बसला आहे. या संदर्भात कोकण किनारा मच्छीमार संघटनेने मच्छीमारांना नुकसानभरपाई देऊन रसायनी पाताळगंगा येथील रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या वेळी संघटनेचे सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष जयवंत तांडेल, कमिटी सदस्य विनोद पाटील, प्रदीप पाटील व हिरामण पाटील आदीजन उपस्थित होते.

रसायनयुक्त पाण्यामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील खाडीत माशांवर याचा परिणाम होत आहे. यामध्ये रसायनयुक्त कंटेनर धुतल्यावर पाणी खाडीत प्रवाहित केल्यानेही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र ही समस्या कायम आहे.

हेही वाचा – पाणीकपातीबाबत गणेश नाईकांची तीव्र नाराजी, जलसंपन्न नवी मुंबई शहरात पाणीकपात करणे पालिकेला भूषणावह नसल्याचे मत

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

जलप्रदूषणात वाढ झाली असताना याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत.