लोकसत्ता टीम

उरण: तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेल्या करंजा ते उरण या मार्गाची दुरवस्था झाली असून त्यामुळे या रस्त्याची वाट बिकट बनली आहे. आधीच पाण्यासाठी वणवण सुरू असतांना येथील नागरीकांना आता पिण्याच्या पाण्याबरोबरच रस्त्याच्या नागरी सुविधेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

करंजा हे एक राज्यातील महत्त्वाचे मच्छिमार बंदर आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील उरण व अलिबाग या तालुक्याना जलमार्गाने जाणारे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे या चाणजे ग्रामपंचायत मध्ये मोडणाऱ्या विभागाची लोकसंख्या ही २५ हजार पेक्षा अधिक आहे. या महत्वाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत.

तर दुसरीकडे याच रस्त्याच्या कडेला जल वाहिन्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असून त्यातील माती रस्त्यावर येत असल्याने आधीच अरुंद असलेल्या रस्त्यातून प्रवास करणे जिकरीचे व धोकादायक बनले असल्याचे मत करंजा येथील नागरीक विनायक पाटील यांनी व्यक्त केले आहे. या अरुंद रस्त्यामुळे एखादे मोठे वाहन आल्यानंतर वाहतूक कोंडीचा ही सामना करावा लागत आहे. त्यामुळे उरण ते करंजा या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

Story img Loader