जगदीश तांडेल, लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होणाऱ्या उरण मधील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात आपला ठसा उमटविला आहे. असे असूनही उरण तालुक्यात खेळाडूंना हक्काचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना धोकादायक रस्ते आणि अनेक प्रकारचे प्राणी व गवत असलेल्या जंगल परिसरात सकाळ संध्याकाळी सराव करावा लागत आहे. त्यामुळे उरणच्या खेळाडूंवर कोणी मैदान देत का मैदान अशी आर्त हाक देण्याची पाळी आली आहे.

मुंबई व नवी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज्यातील प्रमुख औद्योगिक उरण तालुक्यातील खळाडूंना खेळण्यासाठी एक सुद्धा मैदान उपलब्ध नाही. तरीही उरण मधील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डी, खो खो,कुस्ती,बॉक्सिंग, वेट लिपटींग,पोहण्या सह धावण्याच्या खेळात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात आपला ठसा उमटविला आहे. उरणच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतांना अशा प्रकारचे यश मिळविले आहे. खेळातील विशेष प्रविन्य यामुळे अनेक तरुणांना काही प्रमाणात रोजगार ही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांचे करियर खेळामुळे घडू लागलं आहे. त्याचवेळी मात्र उरण मधील खेळाडूंना व त्यांच्या पालकांना आपल्या मुलांच भविष्य घडविण्यासाठी मुंबई किंवा नवी मुंबईतील मैदानावर जावे लागत आहे. मात्र हे ज्या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. अशाच खेळाडूंना याचा फायदा होत आहे. मात्र ज्या खेळाडूंची आर्थिक ऐपत नाही. त्यांना उरण मधील वाहने धावणाऱ्या धोकादायक रस्त्यावरून सराव करावा लागत आहे.

आणखी वाचा-पनवेलमध्ये क्रेझी बॉईज या बारचा परवाना रद्द

खेळाडूंच्या जीवाला धोका, सुरक्षा ऐरणीवर

उरण मधील खेळाडूंना सुरक्षित मैदान नसल्याने या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूला वाहने चालणाऱ्या रस्त्यावर सराव करावा लागत आहे. त्याचप्रमाणे सध्या बोकडविरा परिसरातील मधील जंगल परिसरात खेळाडू सराव करीत आहेत. या परिसरात मोठया प्रमाणात जंगल वाढलेले आहे. त्यामुळे अनेक सरपटणारे प्राणी व जंगली प्राणी ही या परिसरात असण्याची शक्यता आहे. अशाही स्थितीत अनेक खेळाडूंनी मेहनतीने गवत व झाडे साफ करून मैदान तयार केले आहे. या मैदानावर सराव केला जात आहे. या मैदानांवर पोहचण्यासाठी नादुरुस्त रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : लॉजिस्टिक पार्कला बेकायदा बांधकामांचा विळखा

तालुका क्रीडांगणासाठी भूखंडाची प्रतिक्षा

मागील १२ वर्षांपासून शासनाच्या क्रीडा विभागाकडून सिडकोला मैदानाच्या भूखंडाची मागणी केली आहे. त्यासाठी द्रोणागिरी नोड मधील सेक्टर ५२ मधील भूखंड देण्याचे सिडकोने मान्य केले आहे. या भूखंडाची प्रतिक्षा कायम आहे. उरण मधील तालुका क्रीडांगणासाठी सिडको कडून भूखंड मिळणार आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असून हा भूखंड तालुका क्रीडा समितीच्या नावे झाल्यानंतर तातडीने शासना कडून निधी मंजूर होईल अशी माहिती क्रिडा विभागाच्या मानसी मानकर यांनी दिली.

एक कोटींचा निधी पडून

उरण तालुका क्रीडा संकुलासाठी १२ वर्षांपूर्वी १ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी वापरा विना पडून आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran players eagerly wait for the ground mrj
Show comments