उरण : राज्यात विजेची मागणी वाढल्याने वीज तुटवडा भासत असताना उरणमधील वीज केंद्रातील वीजनिर्मितीत घट झाली आहे. अपुऱ्या वायुपुरवठय़ामुळे उरणमधील या वीज केंद्राचे चार संच बंद पडले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे उरणमध्ये वायू वीज केंद्र (जीटीपीएस) असून गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात वीजनिर्मितीसाठी लागणार पुरेसा वायुपुरवठाच होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील विद्युतनिर्मिती करणाऱ्या सहा पैकी चार संच बंदच ठेवावे लागत आहेत. या प्रकल्पाची ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीच्या क्षमता असून ती यामुळे निम्म्याहून अधिक घटली आहे.
जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ साली उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहा संचांतून ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे चार संच बंद आहेत. आता सुरू असलेल्या दोन संचांसाठी दररोज २.५ क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र फक्त सरासरी १.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा कंपनीकडून होत आहे. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॉट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.
वीजनिर्मितीचे संच सातत्याने बंद ठेवले जात असल्याने कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले संच भंगारात जाऊन नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या वीजनिर्मिती केंद्राचे विस्तारीकरण करण्याची योजनाही आखण्यात आली होती. या विस्तारीकरणाच्या योजनेमुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढून १२२० मेगावॉटपर्यंत पोहचणार होती. मात्र १२२० वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला आहे. वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शंभर टक्के गॅसपुरवठा झाल्यास सध्याची प्रकल्पाची क्षमतेप्रमाणे ६०० मेगावॉटची वीजनिर्मिती करणे फारसे अवघड नाही.
मात्र गॅसचा किती प्रमाणात पुरवठा करावा याबाबतचे धोरण केंद्र सरकार आणि ओएनजीसी व गेल या कंपन्यांच्या माध्यमातून ठरत असल्याने त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रकल्पाला सध्या गॅसपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अपुऱ्या गॅसपुरवठयामुळेच वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल कंपनीकडून आवश्यकतेनुसार वायू विद्युत केंद्राला पुरवठा होत नाही. त्यामुळे १२२० वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला आहे.-महेश आफळे, जनसंपर्क अधिकारी, वायू विद्युत केंद्र, उरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा