उरण : उरण ते नेरुळ/ बेलापूर मार्गावरील उरण रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जवळपास दीड ते दोन तास अंधार पसरला होता. वीज नसण्याचे प्रसंग येथे वारंवार येत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. अनेकदा प्रवाशांना आपल्या मोबाइलच्या प्रकाशाचा आधार घेत मार्गक्रमण करावे लागत आहे.

१२ जानेवारी २०२४ रोजी सुरू झालेल्या उरण ते नेरुळ/बेलापूर मार्गावरील लोकलच्या स्थानकात गेल्या १६ महिन्यांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात स्थानकात अंधार पसरणे, स्थानकातील साफसफाई बंद झाल्याने होणारी घाण, स्वछतागृहाची समस्या, प्रवाशांना स्थानकात वाहने उभी करण्यासाठी मोजावे लागणारे अधिकचे दर तसेच इतर अनेक समस्यांचा सामना करावा लावत आहे. त्यातच उरण स्थानकातून सकाळी पहाटे सुटणाऱ्या ६ वाजून पाच मिनिटांच्या लोकलच्या वेळी अनेकदा स्थानकातील वीज गायब असल्याने तसेच नव्याने ऐन गर्दीच्या वेळी लोकल रस्त्यात नादुरुस्त होऊन बंद होण्याच्या घटनांचीही यात भर पडली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद नव्हता.