उरण : शनिवारी व रविवारी दोन दिवस उरणच्या शेती क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवसांचा पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे उरणमधील शेकडो हेक्टर जमिनीवरील भातपिके संकटात आली होती. मात्र हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात शेतीत पाणी वाढल्याने भात पिकांना संजीवनी मिळालेली आहे.
अनेक दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिक हे उकाड्याने त्रस्त झाले होते. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे उरण तालुक्यातील गावे आणि शहराला तसेच उद्याोगांना पाणीपुरवठा करणारे रानसई पुनाडे ही दोन्ही धरणे भरली आहेत. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. उरण तालुक्यातील नागाव, केगाव, चाणजे व खोपटे, कोप्रोली, चिरनेर, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीचे पीक घेतले जात आहे. हे साधारण २ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. पंधरा दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे शेतातील पिके पाण्याविना करपू लागली आहेत. त्याच्रमाणे काही ठिकाणी पिकावर करपा रोग आला आहे.
हेही वाचा – नवी मुंबईत आता पर्यटन विकास आराखडा
पाऊस थांबल्याने भात पिके मूळ धरू शकली नाहीत. त्यातच ढगाळ वातावण निर्माण झाल्याने पिकावर तूर्तुऱ्या रोगाचाही प्रादुर्भाव वाढू लागला असून शेतकऱ्यांची शेती हातची जाण्याची वेळ आली होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
© The Indian Express (P) Ltd