उरण : रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करून वाढते प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी पाडेघर-गव्हाण फाटा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर उरण सामाजिक संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे. या धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घाला या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा..नवी मुंबई : पालिकेच्या लेखी या पाणथळी नाहीत? छायाचित्रे प्रसारीत पर्यावरणप्रेमींचा सवाल
राष्ट्रीय महामार्गावर मातीच्या डम्पर मुळे आणि इतर जड व अवजड वाहनामुळे तसेच बाजूच्या क्रशर-दगडखाणीमुळे धुळ आणि माती महामार्गावर येत आहे. मार्गावरून चोवीस तास वाहने चालत असल्यामुळे या धुळ-माती हवेत उडून या परिसरात नेहमीच धुळीकणांचे साम्राज्य पसरले आहे. या वातावरणातील धुळीकण हवेतून उरण- पनवेल-नवी मुंबई परिसरात पसरल्यामुळे या विभागातील नागरीकांना दिर्घ काळ खोकला आणि श्वसनाचे आजार जडले आहेत.
हेही वाचा…कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ
त्यासाठी उपाययोजना म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पाडेघर-गव्हाण परिसर महामार्गावरील आणि इतर ठिकाणचीही धुळ-माती पूर्णपणे साफ करा, धुळ-माती पडणारा रस्ता नियमितपणे पाण्याने धुवून काढा. गव्हाणफाटा परिसरातील क्रशर-दगडखाणीचे धुळ महामार्गावर पडू नये म्हणून त्या ठिकाणी पार्टिशन लावण्यात यावेत. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निदर्शनात संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार आणि उपाध्यक्ष राजेंद्र मढवी,रमाकांत म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.