उरण तालुक्याला पाणी पुरवणाऱ्या नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून दररोज १० एमएलडी पाणी खेचले जात असून या पाणीपुरवठय़ात कपात करून दहाऐवजी सहा एमएलडीच पाणीपुरवठा होत असल्याने उरणमध्ये आगामी ६२ दिवस पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात एमआयडीसीकडून हेटवणे प्रकल्पाच्या प्रशासनासोबत चर्चा सुरू असून यातून मार्ग निघू शकेल, असा विश्वास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रानसई धरणात मागील वर्षीपेक्षा एक मीटरने अधिक पाणी असल्याने उरणवरील पाणी संकट दूर होईल.
उरण तालुक्यातील वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. मात्र उरणला पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ वर्षांपूर्वी रानसई येथे उभारण्यात आलेल्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. १० दशलक्ष घनमीटरची क्षमता असलेल्या रानसई धरणातून गाळ साचल्याने केवळ ८ दशलक्ष घनमीटरच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून पूर्वी एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु बारवी धरणानेही तळ गाठल्याने पाणी संकट निर्माण झाले आहे. उरण तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या हेटवणे धरणातून एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
हेटवणेच्या जलवाहिनीतून एमआयडीसीला १० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे उरणमधील पाणी कपातीचे संकट दूर होते. मात्र हेटवणे धरणातील पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आल्याने उरणसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. या संदर्भात हेटवणे धरणाच्या प्रशासना सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती एमआयडीसी उरणचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी दिली. तसेच मागील वर्षीपेक्षा रानसई धरणातील पाणीसाठा अधिक असल्याने उरणकरांवर पाणी कपातीचे संकट येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.