बांधकामाचा १२ कोटींचा निधी पडून, इमारतीचा धोकाही वाढला
उरण शहरात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १९९६ला उभारण्यात आलेला टाऊन हॉल नव्याने बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने त्याचे काम रखडले आहे. बांधकामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची मंजुरी लागते. परंतु नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप पदभार न सांभाळल्याने त्यांच्या मंजुरीविना या टाऊन हॉलचे काम रखडले आहे.
विकासात्मकदृष्टय़ा वाढत जाणाऱ्या उरण शहरात किमान एक हजार प्रेक्षक बसून कार्यक्रम पाहू शकतील अशी एकही जागा नाही. शहरातील सांस्कृतिक गरज लक्षात घेता १९९६ साली नगरपालिकेने उरण मोरा रस्त्यालगत ९५० आसनव्यवस्था असलेला ‘राजीव गांधी टाऊन हॉल’ बांधला. याच सभागृहाला लागून एक छोटे सभागृह व वाचनालयही बांधण्यात आले. आज या सभागृहाला २० वर्षे झाली आहेत. आता ही इमारत कमकुवत झाली आहे. पावसाळ्यात सभागृहाच्या छताला गळती लागते. वाचनालयाचीही दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या वाचनालयातील लाद्यांमधून पाणी येते. तसेच छतही गळत असल्याने वाचकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे वाचनालयातील स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. एकंदरीत सभागृहाची ही इमारत धोकादायक स्थितीत आली आहे. त्यामुळे इमारत पाडून त्या ठिकाणी नव्या ‘टाऊन हॉल’ची उभारणी करावी असा प्रस्ताव नगरपालिकेने तयार केला आहे. या प्रस्तावात उत्पन्नाच्या दृष्टीने व्यापारी दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारकडून १२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश बालदी यांनी दिली. बांधकामाच्या प्रस्तावास मुख्याधिकाऱ्यांची परवानगी लागते. परंतु नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सांभळलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंजुरीविना हे काम रखडले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून नगरपालिकेचा कारभार सुरळीत करावा, अशी सूचना करणारे पत्र नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारण्याचा आणि सभागृह कामाच्या मंजुरीकडे आता उरणवासीयांचे लक्ष लागले आहे.