लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : सामाजिक सलोख्याचे प्रतिक असलेल्या उरणला तरुणीच्या हत्येच्या निमित्ताने बाहेरून येऊन विविध राजकीय नेते आणि संघटना धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तरुणीच्या हत्येनंतर एकजुटीने उभे राहणाऱ्या उरणच्या नागरिकांकडून संताप आणि तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
उरणला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही दोन समाजातील तेढीचा इतिहास नाही. मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे उरणच्या अनेक वर्षांच्या सामाजिक सौहार्दाला धक्का बसत आहे. उरण मधील तरुणीची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सर्व समाज एकवटला आहे. तरुणीला न्याय व आरोपीला फाशी ही मुख्य भूमिका जनतेकडून घेतली जात आहे. मात्र तरुणीच्या मृत्यूनंतर त्याचे भांडवल करून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या प्रक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. काही राजकीय पक्षांनी लाभासाठी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकारण्यांनी नावासह लावलेल्या श्रद्धांजलीच्या बॅनर फाडत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
उरणमधील २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह शनिवारी शवविच्छेदनासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शेकडो नागरिकांनी धाव घेतली. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. रुग्णालय परिसरातील जमावासमोर संवेदनशील बनलेल्या नेत्यांनी हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले. यावेळी आरोपीला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी विविध समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांना दिली.
त्यानंतर मात्र काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हत्येचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उरण शहरातील ठिकठिकाणी तरूणीच्या श्रध्दांजलींचे फलक लावले आहेत. एका पक्षाने बॅनर लावल्यानंतर रातोरात दुसऱ्या पक्षानेही फलकावर आपापल्या नावांचा उल्लेख केला.
रविवारच्या सर्वपक्षीय जनक्षोभ मोर्चात अनेक आक्षेपार्ह घोषणा दिल्या जात होत्या. भाषणे केली जात होती. राजकारण्यांच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी श्रद्धांजलीच्या बॅनरखाली असलेली नावे कापून आपला संताप व्यक्त केला. काही राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यालयासमोरच नागरिकांनी निषेध व्यक्त केला. यामुळे सध्या उरणमध्ये हत्येबरोबरच राजकीय वातावरणही तापत चालले आहे.
© The Indian Express (P) Ltd