संतोष जाधव
हातगाडय़ांवरील खाताय? सावधान! अन्न विषबाधेचा धोका
शीतेपेयांमध्ये रस्त्यावरील बर्फ वापरत असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने समोर आणल्यानंतर आता दुभाजकांसाठीची पिण्याअयोग्य पाणी रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ांवर वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला हा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे हे पाणी टँकरने पुरवठा केलेले असल्याने अन्नातून विषबाधेचा धोका आहे. शहरात इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे केवळ शहर सौंदर्याला बाधा येत नसून त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते. खुलेआम रस्त्यांच्या कडेला हातगाडय़ांवर घरगुती सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यासाठी सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे असे खाद्यपदार्थ खाणारे स्वत:च्या जिवाशी खेळत असतात.
तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली होती. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले होते. मात्र मुंढेंची बदली होताच, कारवाई काहीशी सैल झाल्याने फेरीवाले पुन्हा बिनबोभाट व्यवसाय करू लागले आहेत. नवी मुंबई शहरात फक्त २ हजार १३८ अधिकृत फेरीवाले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांसाठी विशेष धोरण राबविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे. मात्र अद्याप तरी ही योजना कागदावरच आहे.
रस्त्यांवरील हातगाडय़ांवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. नेरुळ स्थानकाच्या पश्चिम विभागातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते हातगाडय़ांवरच खाद्यपदार्थ तयार करतात. त्यासाठी सर्रास पिण्यायोग्य नसणारे पाणी वापरले जाते. एका फेरीवाल्याकडे काम करणाऱ्या मुलास विचारले असता पाणी टँकरमधून आणल्याचे त्याने सांगितले. रस्त्याच्या दुभाजकाला दिले जाणारे पाणी फेरीवाले डब्यात भरून ठेवतात. ते पाणी पालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून आणले जाते. ते अर्थातच पिण्यायोग्य नसते. तेच पाणी प्लास्टिकच्या डब्यात साठवून ठेवून भांडी धुण्यासाठी तसेच पदार्थ बनविण्यासाठी वापरतात. नागरिकांना पिण्यासाठीही तेच पाणी दिले जाते. अशा पद्धतीने फेरीवाले नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. फेरीवाले रस्त्यामधील दुभाजकांमध्ये टाकल्या जाणाऱ्या टँकरमधील पाणी घेत असतील तर योग्य तपासणी करून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना योग्य समज दिली जाईल, असे पालिकेच्या उद्यान साहाय्यकाने सांगितले.
शहरातील फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान त्यांचे सामानही जप्त केले जाते. नेरुळ विभागात कारवाई करण्याच्या सूचना विभाग अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
– दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ १
उघडय़ावरचे पदार्थ खाणेच चुकीचे आहे. नित्कृष्ट दर्जाचे पदार्थ, अशुद्ध पाणी वापरले जाते. शिवाय धुलीकणही पदार्थावर बसतात. कोणतेही पोषणमूल्य नसतात. त्यामुळे असे पदार्थ अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे उघडय़ावर खाणे टाळावे.
दत्ता पटेल, आहारतज्ज्ञ, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय