लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : शेती उत्पादनातून उरलेल्या कचऱ्यापासून बनवण्यात आलेल्या पेंढ्या अर्थात ब्रिकेट आता अंत्यसंस्काराच्या वेळी वापरण्यात येणार आहेत. त्याचा वापर मात्र ऐच्छिक असेल. नवी मुंबई मनपाने अनेक प्रकल्प असे उभे केले आहेत जे आज इतर मनपांसाठी पथदर्शी ठरले आहेत. असाच हा आणखी एक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यामुळे अंत्यविधीवेळी होणाऱ्या प्रदूषणात घट होणार आहे.

ब्रिकेटचा प्रयोग हा पहिल्यांदाच मुंबई क्षेत्रात केला जाणार आहे. वास्तविक याची चाचणी दोन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प तांत्रिक कारणांनी मागे पडला. मात्र आता त्याला वेग देण्यात आला असून सुरुवातीला नेरुळ स्मशानभूमीत प्रयोग केला जाणार आहे. अंत्यसंकाराच्या वेळी वापरण्यात येणारी लाकडाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याऐवजी हे ब्रिकेट वापरले तर लाकडापेक्षा प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळेच पर्यावरणपूरक अग्निसंस्कार म्हणून ब्रिकेट ओळखले जाते. त्याच्या वापरासाठी सध्या वापरात असलेल्या साच्यात काही बदल करण्यात येणार आहेत. अशा ब्रिकेटचा वापर यापूर्वी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिकेत सुरू केला आहे.

आणखी वाचा-उरणमधील एनएमएमटी बससेवा बंद

या शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणात शेती असल्याने शेतातील कृषी कचरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ब्रिकेट खूप स्वस्त पडतात. मात्र नवी मुंबई शहराच्या आसपास त्या प्रमाणात शेती नसल्याने ब्रिकेट आणण्यासाठी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे छ. संभाजीनगरच्या मानाने खर्च जास्त होऊ शकतो.

नवी मुंबईत अंत्यसंस्कार खर्च मनपाचे करते. त्यामुळे ब्रिकेटचा खर्चही मनपाच करणार आहे. लाकडाच्या मानाने ब्रिकेट स्वस्त असले तरी वाहतूक खर्चामुळे लाकूड आणि ब्रिकेट यात फार मोठा फरक पडणार नाही. मात्र प्रदूषण खूप कमी होत असल्याने ब्रिकेट वापरास प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र त्याचा वापर हा ऐच्छिक असेल. ब्रिकेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या बेवारस मृतदेहांवर त्याचा उपयोग केला जाणार आहे.

आणखी वाचा-अलिबाग-विरार कॉरिडॉर भूसंपादनाला विरोध, शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन

पर्यावरणात समतोल ठेवण्याचा प्रयत्न म्हणून आपण आता अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडा ऐवजी ब्रिकेट वापरास प्राधान्य देणार आहोत. पुढील महिन्यापासून त्याचा वापर सुरवातीला नेरुळ स्मशानभूमीत सुरु करणार असून लाकडा ऐवजी ब्रिकेटचा वापर वाढण्यासाठी जनजागृती करणार केली जाईल. -सोमनाथ पोटरे, उपायुक्त परिमंडळ एक

नवी मुंबई मनपाने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. या कल्पनेचे आम्ही स्वागत करतो तसेच नॅटकनेक्ट फाऊंडेशनने पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे. दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येचे निराकरण करू शकत. -बी एन कुमार, अध्यक्ष, नॅटकनेक्ट फाऊंडेशन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of eco friendly briquette for crematories navi mumbai municipal corporation on pilot basis mrj