उरण: बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्या सुरू होणार आहेत.काही ठिकाणी पोपट्यांना लागू लागल्या आहेत. थंडीची सुरुवात झाल्यानंतर खवय्यांना पोपटाचीही आस लागलेली असते. मात्र वालाच्या शेंगांना उशीर होत असल्याने पोपटाची प्रतिक्षा असते. यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच बाजारात वालाच्या शेंगा आल्या आहेत. त्याची खरेदीही सुरू झाली आहे. या शेंगांना किलोमागे १०० रुपये दर आकारला जात आहे. वालाच्या पोपट्या या उरण तालुक्यातील चिरनेर तसेच इतर अनेक भागातून लावल्या जातात.
वालाच्या शेंगांच्या पोपटीची लज्जत आणि चव ही सात समुद्रा पलीकडे पोहचली आहे. गवत आणि लाकडाच्या आगीवर वाफेवर शिजविलेल्या शेंगा तयार केल्या जातात. सुरुवातीला केवळ वालाच्या शेंगांच्या ऐवजी सध्या विविध प्रकारच्या शेंगा,वांगी,बटाटा, तसेच अंडी,चिकन ही या पोपटीत शिजविले जाते. तेला शिवाय वाफेवर शिजणाऱ्या जिन्नस चवीला उत्कृष्ट असतात.
हेही वाचा… उरणमध्ये मंगळवार ठरला घातवार; कंटेनरच्या धडकेत एकाच दिवशी अपघात; दोघांचा मृत्यू
त्यामुळे पोपटी ही अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे. असे असले तरी ठराविक ठिकाणच्या पोपटीला खवय्यांकडून पसंती दिली जाते. त्यात उरण तालुक्यातील चिरनेर परिसराचा समावेश आहे. या पोपटीची खरी जिन्नस म्हणजे शेतात व बांधावर मिळणार म्हामोट्याचा पाळा ही आहे. यापाल्याचा जखमेवर लावण्यासाठी उपयोग केला जातो.
कशी बनते पोपटी
एका मडक्यात बुंध्याला म्हामोटा(पाळा)त्यानंतर एक थर शेंगा व इतर जिन्नस यांना मीठ मसाला लावून त्यानंतर पुन्हा म्हामोटा असे थर लावले जातात. त्यानंतर शेवटी म्हामोट्याच्या पाळ्यानी मडक्याचे तोंड बंद केले जाते. मंडक उपड करून ठेवलं जात. त्यानंतर लाकडं व गवत रचून त्याला पेटवण्यात येत. ही आग आणि त्याची धग पाऊण तास ते एक तास कायम ठेवली जाते. या वाफेचा वास आल्यानंतर मंडक काढून ते रिकाम केलं जातं.आणि वाफाळेल्या शेंगांचा आस्वाद घेतात.
पाणी आणि दवाच्या वालाच्या शेंगा
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा या शेतांच्या बंधावर पाणी आणि रसायनांचा वापर करून पिकविल्या जातात. तर चवीच्या खऱ्या शेंगा या शेततातील पिके काढल्यानंतर शेत जमिनीला ओलावा असतांना वालाची पेरणी केली जाते. या वालाच्या पिकाला कोणतेही रसायन किंवा पाणी दिले जात नाही तर हे वालाचे पीक नैसर्गिक रित्या येते त्यामुळे या वालाच्या शेंगांच्या किंमतीही जास्त असतात. आणि त्याचीच पोपटी ही अधिक चविष्ट असते. या वालाच्या पिकाची पेरणी पंधरा दिवसांपूर्वी केली असून हे पीक येण्यासाठी ६० ते ७० दिवस लागतात. त्याचप्रमाणे आशा प्रकारच्या नैसर्गिक पिकामुळे जमिनीची पोत वाढण्यासाठी होत असल्याची माहिती चिरनरे येथील कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.