१६ जानेवारीला पुन्हा आंदोलनाचा निर्धार
दिवंगत नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांची ९० वी जयंती बुधवारी साजरी केली जाणार असून दिबांचे जन्मगाव असलेल्या जासईसह उरण व पनवेलमध्येही जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या वेळी खास करून जासई येथे दिबांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करून दिबांना आदरांजली वाहिली जाणार आहे. दिबांचे स्मरण करण्यासाठी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. या वेळी जासईत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
१६ आणि १७ जानेवारी १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याच दिवशी सध्या जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या नवीन शेवा गावात पोलिसांनी शेतकऱ्यांवर पहिला गोळीबार केला होता. त्यानंतर पेटलेल्या या आंदोलनाने उग्र रूप धारण केल्याने १६ जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले तर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांनी आपले आत्मबलिदान केले होते.
२०१२ साली अखेरचा लढा देत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाची मागणी सरकारकडून मान्य करून घेतली. मात्र चार वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दि.बा. हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच लढले. त्यांनी न्याय्य हक्क मिळविण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. तिच्या आधारेच आम्ही लढू, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. त्यामुळे येत्या १६ जानेवारीच्या हुतात्मादिनी पुन्हा एकदा जासई, रांजणपाडा, एकटघर व सुरुंगपाडा या ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील व सुरेश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा