नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी बाह्य उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता आहे. आर्थिक बळकटी वाढविण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी शहरातील बस आगारात बस टर्मिनस आणि वाणिज्य संकुल उभारण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपात वाशी डेपोच्या जागेवर आधुनिक बस आगार आणि २१ मजली वाणिज्य संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक वर्षे हा प्रकल्प पर्यावरण मंजुरीत रखडला होता.
मात्र आता त्याचे काम सुरू झाले असून आतापर्यंत ७०% ते ७५% बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या जून २०२३मध्ये या संकुलाचे काम पूर्ण होऊन लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी दिली आहे.ही २१ मजली इमारत १०३७७ चौमी क्षेत्रफळामध्ये उभारण्यात येत असून या इमारतीला जोडूनच पाठीमागे तळमजल्यावर १३ बसस्टॉपची व्यवस्था असलेले बस टर्मिनस तसेच ४ मजली पार्कींग असणार आहे. याठिकाणी ५ इलेक्ट्रिकल चार्जिंग पॉईंट्सचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. २१ मजली इमारतीमध्ये दुकानांकरिता जास्त उंचीच्या जागा तसेच विविध कार्यालयासाठी जागा उपलब्ध असणार आहेत.
हेही वाचा : नवी मुंबई: दिवाळी उत्साहात….पण बेकायदा बॅनरबाजी जोशात
या संकुलात नियंत्रण कक्ष, सार्वजनिक शौचालय, उपहारगृह, हॉटेल्स, व्यवसायिक गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी १५९कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हुन अधिक मजल्याची स्लॅबचे काम झाले असून ७०%-७५% बांधकाम झाले आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू उभारली जात असल्याने ती शहराचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.