नवी मुंबई: घरफोडी करणाऱ्या एका आरोपीस वाशी पोलिसांनी अटक केली असून तो कुप्रसिद्ध शिकलगार टोळीचा असल्याचे समोर आले आहे. त्याच्या अटकेमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून १२ लाख ३० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी हे सराईत असून यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात अटक होते. या शिवाय घरफोडी, वाहन चोरी ,हत्या, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर आहेत.
ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे. वाशीत राहणारे अश्विनी प्रसाद यांच्या घरातून याच टोळीने सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी केले होते. याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी एक पथक नेमले होते. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, सत्यवान बिले पोलीस हवालदार चिकने , वारिंगे, पोलीस नाईक चंदन मस्कर, संदीप पाटील, ठाकूर पोलीस शिपाई अमित खाडे यांचा समावेश होता. या पथकाने तपास करताना गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले व आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासण्यात आला होता. तसेच आरोपी हे गुन्हा करतेवेळी घटनास्थळी मुखपट्टी, हातमोजे घालून आल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत जिकरीचे होते. तसेच सदर आरोपींनी गुन्हा करताना पांढऱ्या रंगाच्या झेन गाडीचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यात एक अडचण होती. आरोपी गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने ही काही अंतरावर गेल्यानंतर बदलत होते. त्यामुळे माग काढणे अवघड झाले होते.
हेही वाचा… नवी मुंबई : टाकाऊ वस्तूंपासून बनवले देखणे शौचालय, राज्यातील पहिलाच प्रयोग
मात्र अत्यंत बारकाईने घटनास्थळावरील तसेच आरोपी पळून गेलेल्या मार्गातील सुमारे ३५० ते ४०० सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. या प्रयत्नांना यश आले आणि यातील कलानी हा कुठे राहतो त्याबाबत ठोस माहिती मिळाली. तसेच आरोपी शिकलगार म्हणून कुप्रसिद्ध टोळीचा सूत्रधार असल्याचे समोर आले. आरोपीच्या घराच्या आसपास दोन दिवस वेषांतर करून सापळा रचून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा हत्येच्या गुन्ह्यातून २०२२ मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. याशिवाय २०१५ मध्ये वाशी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करताना एका महिलेच्या डोक्यात लोखंडी गजाचा घाव करून तिची हत्या केली होती. या गुन्ह्यात कलानी याचा सहभाग असल्याचेही समोर आले. वाशीतील गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटार सायकल तसेच घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे तसेच गाड्यांच्या वेगवेगळ्या बनावट क्रमांकाच्या पाट्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. या टोळीने नेरुळ परिसरातून एक इको कार तसेच एक झेन कार चोरी करून त्यांचा वापर चोरी करण्यासाठी वापर केला. ही सर्व माहिती अटक केल्यावर केलेल्या चौकशीतून समोर आली आहे, कलानी याच्या कडून आतापर्यंत २५ तोळे सोने तसेच नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन कार हस्तगत करण्यात आलेले आहेत.असा एकूण १२ लाख ३० हजार ४३०रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नमूद आरोपी कडून वाशी पोलीस ठाणे कडील १ तसेच नेरूळ पोलीस ठाणे कडील ०३ उघडकीस आले आहेत. आरोपींचा पूर्व इतिहास पडताळला असता त्यांनी राजस्थान, गुजरात, राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. वाशीतील गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.