नवी मुंबई : वाशी वाहतूक शाखेने मार्च महिन्यात विशेष मोहीम राबवली. यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ६९६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ६८ लाख ८१ हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी ११ लाख ८२ हजार ३०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.नवी मुंबईत वाशी सर्वाधिक वाहतूक असणारा नोड आहे. शिवाय वाशी बिझनेस हब म्हणून ओळखले जात असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. तसेच शीव पनवेल हा सर्वात्रिक व्यग्र महामार्ग व त्याचा पथकर नाका असल्याने वाहतुकीत भर पडते.

अनेकदा वाहतुकीतून वेगात बाहेर पडण्याच्या नादात वाहन बेशिस्त चालविल्याने वाहतूक कोंडी होते. वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोंडणे अशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल १७ हजार ६९६ वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या कडून ६८ लाख ८१ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३१ वाहन चालकांचे परवाना निलंबनाचे प्रस्ताव व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच न्यायालयात हजर न होणाऱ्या १७ वाहन चालकांचे वाहन चालवण्याचा परवाना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय ३२४ वाहन चालकांविरोधात न्यायालयात खटले दाखल करून, २५४ वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई चालू ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी केले आहे.

२९ कर्णकर्कश सायलेन्सर

या विशेष मोहीम अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालवणारे आणि कर्ण कर्कश आवाज येणारे सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात मद्य प्राशन करून वाहन चालवणारे ५० वाहन चालक व कर्णकर्कश सायलेन्सर लावून वाहन चालविणारे २९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.