सिडकोचा नवी मुंबई महानगरपालिकेला दणका; भूखंड परत देण्याचे आदेश
वाशी रेल्वे स्थानकाबाहेर अरुणाचल प्रदेश सरकारला अतिथिगृहासाठी दिलेल्या भूखंडाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याने भूखंड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केलेल्या सिडकोने मंगळवारी नवी मुंबई पालिकेला मध्यवर्ती रुग्णालयासाठी वाशी सेक्टर-१० मध्ये दिलेला भूखंड रद्द केल्याची नोटीस बजावण्यात आली. सिडकोने अठरा वर्षांपूर्वी पालिकेला नऊ हजार चौरस मीटरचा हा भूखंड सार्वजनिक रुग्णालयासाठी दिला होता. पालिकेने यातील एक लाख दहा हजार चौरस फुटांची जागा हिरानंदानी हेल्थकेअरला देऊन टाकली. या हिरानंदानीने ही जागा फोर्टिज रुग्णालयाला कराराने दिली आहे. हा सिडकोबरोबर केलेल्या कराराचा भंग असल्याने भूखंड रद्द करून सिडकोने पालिकेला चांगलाच दणका दिला आहे.
मे १९९५ मध्ये पालिकेत राजकीय सत्ता आल्यानंतर सिडकोकडे सातत्याने मध्यवर्ती रुग्णालयासाठी भूखंडाची मागणी केली जात होती. त्यामुळे सिडकोने २३ सप्टेंबर १९९७ रोजी पालिकेला नऊ हजार चौरस मीटरचा मुख्य भूखंड व पाच हजार चौरस मीटरची मोकळी जागा वाशी सेक्टर-१० अमध्ये दिली. त्यानंतर दोन वर्षांत पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून या भूखंडावर पाच मजली इमारत बांधली. या इमारतीतील अर्धा भाग मोकळा असल्याने २० जानेवारी २००६ मध्ये या इमारतीतील एक लाख दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ हिरानंदानी हेल्थकेअर प्रा. लि. या रुग्णालय साखळी चालविणाऱ्या कंपनीला दिले. काही वर्षांनी या रुग्णालयीन कंपनीने एका सामंजस्य कराराने फोर्टिज या दुसऱ्या रुग्णालयीन साखळी कंपनीला आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे आता केवळ नावाला हिरानंदानी असलेल्या या इमारतीच्या पूर्वेस पालिकेचे तर पश्चिम बाजूस हिरानंदानी रुग्णालय सुरू आहे.
पालिकेने हिरानंदानीला भूखंड भाडेपट्टय़ावर दिलेला नाही. त्यातील काही क्षेत्रफळावर हिरानंदानी रुग्णालय कार्यरत आहे. तात्कालीन सर्वसाधारण सभा आणि पालिका प्रशासनाने लोकहितार्थ हा निर्णय घेतला होता. मंगळवारी नगरविकास विभागाकडे आमची ही बाजू आम्ही मांडली आहे. आता त्याबाबत राज्य शासन निर्णय घेईल.
डॉ. संजय पत्तीवार, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका